राहाता तालुक्यात करोनाचा विस्फोट; 280 करोनाबाधित रुग्ण

शिर्डी 57, राहाता 27, चितळी 36, लोणी खुर्द व बुद्रुक प्रत्येकी 22
राहाता तालुक्यात करोनाचा विस्फोट; 280 करोनाबाधित रुग्ण

राहाता (तालुका प्रतिनिधी) -

राहाता तालुक्यात दिवसभरात करोनाचा मोठा कहर होऊन तालुक्याचा ग्रामिण भाग करोना हॉटस्पाट बनला असून 196 करोनाबाधित रुग्ण तर शहरी भाग असलेला शिर्डीत 57 व राहात्यात 27 करोना बाधित आढळले असून एकूण संख्या 280 एवढी झाल्याने तालक्याची स्थिती गंभीर होऊ पाहत आहे.

सर्वाधिक रुग्ण राहाता 57, चितळी 36, शिर्डी 27 , लोणी बु. 22 लोणी खु. 22, कोल्हार 18, पुणतांबा 11, पिंपळवाडी 8, जळगाव 5, पिंपळस 5, साकुरी 5, दाढ बु. 5, निर्मळ पिंप्री 5, अस्तगाव 6, नांदुर्खी बु. 4, कोर्‍हाळे 5 , सावळीविहीर 4 , वाकडी , पाथरे, बाभळेश्‍वर, भगवतीपूर या गावात प्रत्येकी 3 रुग्ण आढळले आहेत.

चोळकेवाडी , राजुरी , रांजणगाव, चंद्रपुर, डोर्‍हाळे, केलवड व नांदुर बु. या गावात प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहेत. रामपुरवाडी, रस्तापूर, एलमवाडी, अस्तगाव, कनकुरी व दुर्गापूर या गावात प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत. मोठ्या प्रमाणावर सर्वत्रच कोवीड टेस्टिंग सुरू केल्याने मोठी पॉझिटीव्ह संख्या बाहेर येत आहे. सर्वच कोव्हिड सेंटर हाऊसफुल्ल झाली असून रुग्ण अ‍ॅडमीट करताना त्यांच्या नातेेवाईकांची पायपीट होत आहे. सर्वत्रच ऑक्सिजन व रेमडेसिवीर या इंजेक्शनचा पत्ताच नाही. खाजगी कोव्हिड सेंटरची मात्र असून अडचण व नसून खोळंबा अशी गत झाली. सेंटर उघडले पण त्यांच्याकडे ऑक्सिजन शिल्लक नाही. रेमडेसिवीर इंजेक्शन पण नाही लाखो रुपये घेऊनही रुग्णांना सुविधा मिळत असल्याने व दुसरीकडे रेफर करावे तर जागा नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.

खाजगी करोना सेंटरमधील रुग्णांना इतरत्र रेफर करू नका-डॉ गोकुळ घोगरे

ऑक्सीजन शिल्लक नाही म्हणून रुग्णांना खाजगी कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना दुसरीकडे कुठे रेफर करू नये, आहे तिथेच योग्य ते उपचार चालू ठेवावे ऑक्सिजन व इतर आवश्यक पुरवठा लवकरच सुरळीत होईल रुग्णांची गैरसोय टाळावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोकुळ घोगरे यांनी केले आहे.

शिर्डीतील साईबाबा व सुपर स्पेशालीटी करोना सेंटर सिव्हील हॉस्पिटलच्या धर्तीवर चालू केले जात असून दोन्ही हॉस्पिटलचे नोडल ऑफिसर म्हणून डॉ. संजय घोगरे यांची नियुक्ती केली असून साईनाथचे 200 बेड व सुपर स्पेशालिटीचे अत्यावश्यक 100 बेड वगळता बाकी सर्व बेड कोव्हिड सेंटरसाठी राखीव केले असून तातडीने ऑक्सिजन प्लँट सुरू केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com