राहाता तालुक्यात 17 दिवसांत 3315 जण करोनाबाधित

लस नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही; ऑक्सीजनही संपला
राहाता तालुक्यात 17 दिवसांत 3315 जण करोनाबाधित

राहाता (तालुका प्रतिनिधी) - राहाता तालुक्यात गेल्या 1 एप्रिल ते 17 एप्रिल या 17 दिवसांच्या काळात 3315 जणांना करोनाची बाधा झाली. अगोदर राहाता, शिर्डी या शहरी भागात फोफावणार्‍या या करोनाने तालुक्याच्या संपूर्ण गावांना विळखा घातला असून शेकडोच्या आसपास करोनाने बळी या महिन्यात घेतले आहेत. रुग्णालये सर्वत्र हाऊसफुल्ल झाले असल्याने तालुक्यात आरोग्य सेवेची मोठी परवड पहावयास मिळत आहे.

करोनाचा वाढता संसर्ग आणि उपचाराअभावी होत असलेल्या मृत्यूच्या संख्येने आरोग्य यंत्रणेची झोप उडवली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन शोधता शोधता रुग्ण आणि नातेवाईकांची दमछाक होत आहे. रुग्णाची चिंता आणि त्यातून नातेवाईक आणि कोव्हिड रुग्णालयातील कर्मचार्‍यांमध्ये होणारे वाद समोर येत आहेत. करोना रुग्णालयात वाढत्या रुग्णसंख्येने तणावाखाली असलेले आरोग्य कर्मचारी प्रचंड दबावाखाली असल्याचे चित्र राहाता तालुक्यात दिसून येत आहे.

राहाता तालुक्यात प्रवरा कोव्हिड, साईबाबा संस्थानचे कोव्हिड रुग्णालय तसेच बोटावर मोजता येईल एवढेच खाजगी रुग्णालय करोना करिता काम करत आहेत. खाजगी रुग्णालयाची अपुरी व्यवस्था, व्हेंटीलेटरची कमतरता, त्यात रुग्णांची लूटमार यामुळे रुग्ण मेटाकुटीला आले आहेत. खाजगी रुग्णालयात सुरुवातीचे तीन चार दिवस उपचार केले जातात. भरमसाठ बिल आकारणी केली जाते. रुग्ण अत्यवस्थ झाला की इतरत्र रेफर केले जाते. मग पुन्हा रुग्णालय शोधण्याची नामुष्की रुग्णांच्या नातेवाईकांवर येत आहे. कोव्हिड संकट काळात वैद्यकीय कर्तव्य करण्याऐवजी लुटमार करण्यात धन्यता मानणारी काही जमात डॉक्टरी पेशाला बदनाम करत आहे. शासनाने दिलेल्या बिल आकारणीपेक्षा जास्त पैसे उकळले जात आहेत. अनेक तक्रारी प्रशासनाकडे गेल्या मात्र त्यात सुधारणा झाल्याचे पहायला मिळत नाही.

प्रवरा कोव्हिड रुग्णालयात बेड फुल्ल झाल्याने तेथेही रुग्ण वेटींगवर आहेत. साईबाबा संस्थानच्या साईआश्रम फेज 2 मध्ये 288 रुग्णांची व्यवस्था आहे तेथेही बेड शिल्लक नाही. करोनाच्या दुसर्‍या लाटेत तालुक्यात रोज दोनशेहून अधिक करोनाबाधित सापडत आहेत. तालुक्यात अपुरी बेडची संख्या, सुविधांचा वाणवा आणि वैद्यकीय स्टाफची कमतरता पाहता तालुका डेंजरझोनमध्ये जाऊन पोहचला आहे. दरम्यान डॉ. खा. सुजय विखे पा., माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा., महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खा. सदाशिव लोखंडे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल शिर्डीत करोनाचा आढावा घेतला.

साईबाबा संस्थानच्या साईनाथ आणि साईबाबा रुग्णालयात आता कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. साईबाबा रुग्णालयात 150 बेड तर साईनाथमध्ये 300 बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. यात काही बेड ऑक्सिजनचे तर अतिदक्षता विभागातही काही बेड असणार आहेत. या दोन्ही रुग्णालयांत कोव्हिड रुग्णांना उपचार मिळणार असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.

कोव्हिडसाठी राजकीय नेते आणि प्रशासन प्रयत्न करत असले तरी रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा कसा दूर करता येईल यावर तात्काळ उपाययोजना नाही. जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर मिळेल असे सांगण्यात आले मात्र अद्यापही त्यात सुसूत्रता नाही. संस्थानच्या रुग्णालयास रेमडेसिवीर कधी पुरवठा होतो तर कधी होतच नाही. बाहेरून आणा अशी चिठ्ठी दिली जात आहे. रेमडेसिवीर सोबत अनेक महागडी औषधे बाहेरून घ्यावी लागत आहेत. ज्यांचेकडे पैसे आहेत त्यांच ठिक; पण जे गरीब आहेत त्यांची मात्र परवड होत आहे. दुसरीकडे संस्थानच्या धर्मशाळेत कोव्हिड सेंटर उभारण्यात आले मात्र रुग्णालयाजवळ मेडिकलच नाही. नातेवाईकांना दोन तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. महागडी औषधे परवडत नाहीत. संस्थानने वाजवी दरात औषध विक्रीची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

दूध, भाजीपाला , फळे , किराणा दुकानात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडतोय. नागरिक विनाकारण घराबाहेर फिरण्याचे प्रमाणही कमी होत नाही. साहजिकच लॉकडाऊन करून जर संसर्ग कमी होत नसेल तर आता अत्यावश्यक सेवेवरही कठोर निर्बंध येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com