पाथर्डीत दररोज सरासरी शंभरहून अधिक करोना रुग्णांची भर

तालुक्यात करोना लसीकरणाला मोठा प्रतिसाद
पाथर्डीत दररोज सरासरी शंभरहून अधिक करोना रुग्णांची भर

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) -

पाथर्डी तालुक्यात दररोज सरासरी 100 पेक्षा अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा होणार्‍या चाचणीतून समोर येत आहे. यामुळे तालुक्यातील जनता करोना लसीकरणासाठी सरसावली असून यामुळे लसीकरण केंंद्रावर गर्दी होतांना दिसत आहे.

तालुक्यात 12 एप्रिलपर्यंत 422 सक्रिय रुग्ण होते. तर 12 ते 15 एप्रिल या चार दिवसातच नव्याने 642 रुग्ण आढळून आले आहेत. करोनाची बाधा होऊ नये, म्हणून प्रत्येकजण करोना प्रतिबंधात्मक लसीकडे पाहत आहे.

करोना होऊ नये, म्हणून सर्वांची लस घेण्यासाठी धावपळ दिसून येत आहे. सध्या करोनाचे रुग्ण वाढत असून बाधितांमध्ये वेगवेगळे लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी होणारा त्रास अंगावर काढू नये, तात्काळ चाचणी करून घ्यावी.

पाथर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात संशयित रुग्णांची चाचणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत केली जात आहे. करोना काळात त्रास जाणवत असेल तर घाबरून न जाता तात्काळच चाचणी करून घ्यावी व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पॉझिटिव्ह असल्यास उपचार घेण्यास हालगर्जीपणा करू नये, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी केले आहे.

शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दररोज 300 तर ग्रामीण भागातील मिरी, तिसगाव, पागोरी पिंपळगाव, पिंपळगाव टप्पा, खरवंडी कासार या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी 150 नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.

दिवसंदिवस करोना बाधीतांची संख्या वाढत असून तालुक्यात पाच ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर उभारले आहेत. यामध्ये शहरातील उपजिल्हा रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, नवजीवन आश्रम शाळा माळी बाभुळगाव, मोहटादेवी भक्ती निवास, तिसगाव नर्सिंग होस्टेल या ठिकाणी शासकीय तर शहरातील गर्जे बाल रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार होत आहेत. कोविड केअर सेंटर,

उपजिल्हा रुग्णालय, खाजगी हॉस्पिटल मिळून सुमारे 800 रुग्णांला प्राथमिक उपचार मिळू शकतात. उपजिल्हा रुग्णालयात 9 तर खाजगी हॉस्पिटलमध्ये 3 ऑक्सिजन बेड आहेत. सध्यातरी व्हेंटिलेटर सुविधा असलेले एकाही बेडची तालुक्यात सेवा उपलब्ध नाही.

करोना काळात प्रांतधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, तालुका अरोग्य अधिकारी डॉ. दराडे यांच्या नेतृत्वाखाली महसूल, आरोग्य, पोलीस, नगरपालिका प्रशासन काम करत आहे.वाढता करोना साथ रोगाचा संसर्ग पाहता प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी सर्वच नागरिकांची रिघ लागली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com