बंद पडलेला ऑक्सिजनचा टँकर सुरू झाल्याने अनर्थ टळला

प्रशासन साखर झोपेत : राष्ट्रवादीच्या युवकांचे प्रयत्न फळाला
बंद पडलेला ऑक्सिजनचा टँकर सुरू झाल्याने अनर्थ टळला

अहमदनगर (प्रतिनिधी)

शहरात ऑक्सिजनचा साठा संपण्याच्या मार्गावर असतांना बुधवारी पहाटे अडथळ्यांची शर्यत पार करत पुणे येथूल आलेला ऑक्सिजनचा टँकर दिल्लीगेट रोड येथील हुतात्मा स्मारक समोर बंद पडला. यामुळे एकच गोंधळ झाला.

अखेर राष्ट्रवादी पदाधिकारी व तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने बंद पडलेला ऑक्सिजनचा टँकर दुरुस्त करुन जिल्हा रुग्णालय व एमआयडीसी येथील ऑक्सिजन प्लांटला रवाना करण्यात आला. शहराच्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपत असताना शेवटच्या क्षणाला संजीवनीरुपी ऑक्सिजन मिळाल्याने अनेक करोना रुग्णांचे जीव वाचले आणि ऑक्सिजन अभावी मोठी जीवीत हानी होण्यापासून टळली. मात्र, यावेळी प्रशासनातील जबाबदार अधिकारी साखर झोपेत असल्याचे समोर आले.

शहरातील अनेक खाजगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात करोनाचे रुग्ण उपचार घेत आहे. मंगळवारी सकाळीच खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ऑक्सिजन संपण्याची शक्यता वर्तवून रुग्णांच्या नातेवाईकांना स्पष्ट कल्पना दिली होती. तसेच या गंभीर परिस्थितीबद्दल जिल्हाधिकारी यांना सांगून ऑक्सिजनची मागणी केली होती. जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन देखील संपण्याच्या मार्गावर होता.

ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? या गंभीर प्रश्‍नाने सर्वच हतबल झाले होते. अखेर प्रशासनाच्या माध्यमातून पुणे येथून तातडीने ऑक्सिजनचा टँकर मागविण्यात आला. आधी या ऑक्सिजनच्या टँकरला रांजणगाव (पुणे) येथे आरटीओनी अडवले. यामध्ये देखील काही वेळ वाया गेला. पुढे हा टँकर नगर जिल्ह्याच्या हद्दीत पोलीस बंदोबस्तामध्ये आनण्यात आला. मात्र, शहरातील हुतात्मा स्मारकासमोर हा टँकर बंद पडल्याने सर्वांची त्रेधा उडाली. तर दुसरीकडे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे नातेवाईक व हॉस्पिटलचे डॉक्टर ऑक्सिजनच्या प्रतिक्षेत जीव मुठीत घेऊन बसले होते.

हा टँकर बंद पडल्याचे माहिती मिळताच रात्री २ वाजता राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, वैभव ढाकणे व माजी नगरसेवक विपुल शेटीया घटनास्थळी दाखल झाले. तर तोफखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक मेढे व त्यांचे सहकारी देखील मदतीला धाऊन आले. जहागीरदार यांनी टँकरला धक्का देऊन घेऊन जाण्यासाठी मध्यरात्री जेसीबी उपलब्ध केला.

मात्र, ऑक्सिजन टँकरचे वजन २० टनपेक्षा अधिक असल्याने वाहन चालू करण्याशिवाय पर्याय उरला नाही. प्रशासनातील जबाबदार अधिकारी यांना फोन लावला असता कोणीही फोन उचलला नाही. शेवटी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व पोलीसांनी सर्जेपुरा येथील अ‍ॅटोमोबाईलचे दुकान चालक व फिटर असलेले मुनाफ बागवान यांच्याशी संपर्क करुन मशीन बेल्ट उपलब्ध केला. बागवान यांनी ऑक्सिजनचा बंद पडलेला टँकर दुरुस्त केल्याने सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. नंतर ऑक्सिजनचा टँकर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. यामधील अर्धा टँकर रिकामा करुन, उर्वरीत अर्धा टँकर एमआयडीसी ऑक्सिजनच्या प्लँटमध्ये पाठविण्यात आला.

हा टँकर वेळीच चालू नसता झाला, तर शहरात ऑक्सिजन येऊन देखील अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला असता. बुधवारी पहाटे अनेकांचे जीव वाचविण्यासाठी मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. एकीकडे शहरात येऊन देखील बंद पडलेला ऑक्सीजनचा टँकर तर दुसरीकडे प्रशासनाचे जबाबदार अधिकारी झोपेत असल्याने फोन उचलण्यास तयार नव्हते. टँकर दुरुस्त करण्यास उशीर झाला असता, तर खाजगी व जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन संपून अनेक करोना रुग्णांना जीव गमवावा लागला असता.

साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com