करोना संकटात अंत्यविधी करणार्‍या योद्ध्यांचा नगरपरिषदेकडून विशेष सन्मान

तीन कर्मचार्‍यांकडून 175 मृतांवर अंत्यसंस्कार
करोना संकटात अंत्यविधी करणार्‍या योद्ध्यांचा नगरपरिषदेकडून विशेष सन्मान

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोना विषाणूच्या महामारीत मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी काहींचे नातलग पुढे येत नव्हते. अशा वेळी संगमनेर नगरपरिषदेचे कर्मचारी अरविंद गुजर, सतीश बुरंगले व आनंद शेळके यांनी करोना लाटेतील रुग्णांचे अंत्यविधी करत दर्शवलेली माणुसकी ही सर्वांसाठी आदर्शवत ठरली आहे. या करोना योद्ध्यांचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याहस्ते नगरपरिषदेकडून विशेष सन्मान करण्यात आला.

160 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या संगमनेर नगरपरिषदेने करोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्यात सर्वात प्रथम नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याबरोबरच जेवणाची व्यवस्था, औषध पुरवणे, बेडची उपलब्धता करून देणे, रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देणे, रुग्णवाहिका, बायपॅप मशीन, आरटीपीसीआर मशीन उपलब्धता अशा चांगल्या सुविधा दिल्या. संगमनेर हे वैद्यकीय सुविधा, व्यापार, बाजारपेठ, दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्याने राहाता, शिर्डी, कोपरगाव, पारनेर, श्रीरामपूर, सिन्नर, अकोले, जुन्नर अशा विविध भागातून अनेक लोक उपचारासाठी येथे येत होते.

या सर्व काळामध्ये काहींना करोना बरोबर लढताना मृत्यूला सामोरे जावे लागले. करोनाची भीती, शासकीय नियम, अंत्यविधीसाठी अवघड परिस्थिती अशा काळात अनेक रुग्णांचे नातेवाईक जवळ येण्याचे टाळत असताना मृत झालेल्या रुग्णांची हेळसांड होऊ नये याकरिता नगरपरिषदेने सातत्याने पुढाकार घेतला. करोनाबाधित, करोना संशयित व इतर असे सुमारे 175 मृतांचे अंत्यविधी नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी अरविंद गुजर, सतीश बुरंगले, आनंद शेळके यांनी या कठीण काळात रात्रंदिवस काम करून केले. करोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक जवळ येत नसत किंवा काही जण उपस्थित राहत नव्हते.

अशावेळी अनेक मृत व्यक्तींना त्यांनी पाणी पाजणे, त्यांचा सर्व अंत्यसंस्कार करणे ही कामे पार पाडली. रात्री-अपरात्री 24 तास जागून अनेक रात्री त्यांनी काढल्या. अत्यंत प्रामाणिकपणे मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील आपण आहोत या मानवतेच्या भावनेतून मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार केले. या करोना योद्ध्यांनी संकटात जपलेली ही माणुसकी सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे. अत्यंत संकटसमयी मानवतेतून काम करणार्‍या या कर्मचार्‍यांचा नगर परिषदेच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, व सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल आणि शहरातील सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com