राहुरी तालुक्याच्या करोना महामारीत राजकारणी आणि समर्थक गायब

राहुरी तालुक्याच्या करोना महामारीत राजकारणी आणि समर्थक गायब

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात सध्या करोना महामारीने उच्छाद मांडला आहे. तालुक्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

तर बळींची संख्या आता 84 पर्यंत गेली आहे. सध्या 1033 रूग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. अनेक कोव्हिड सेंटरमध्ये बेड आणि ऑक्सिजनसह औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. करोनाबाधितांचे नातेवाईक रूग्णांच्या उपचारासाठी टाहो फोडत असून एकंदर विदारक चित्र राहुरी तालुक्यात निर्माण झालेले असतानाच मतांचा जोगवा मागून आपली राजकीय पोळी भाजून घेणारे अनेक राजकारणी, राहुरी व देवळाली प्रवराचे नगरसेवक, त्यांचे चमकोगिरी करणारे समर्थक गायब झाले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

राहुरी तालुक्यात अद्यापपर्यंत एकूण 5 हजाराहून अधिक नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. तर बळींची संख्या 84 आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक रूग्णांना वैद्यकीय उपचार वेळेवर मिळणे अत्यावश्यक बनले आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने राहुरी तालुक्यातील काही नागरिकांचा बळी गेला आहे. तालुक्यात अनेक कोव्हिड सेंटरची उभारणी केली असली तरी अनेक ठिकाणी ‘चणे आहेत तर दात नाही’ अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे साहित्याची कमतरता असल्याने अत्यवस्थ रूग्णांचीही संख्या वाढत आहे. रूग्णांचे नातेवाईक अडथळ्यांची शर्यत पार करून रूग्णासाठी जिवाचा आटापिटा करीत आहेत.

अशावेळी राहुरी तालुक्याच्या राजकारणात चमकोगिरी करणारे काही नेते आणि कार्यकर्ते मात्र, नागरिकांपासून चारहात दूर राहून रूग्णांची तडफड पहात आहे. निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन दारोदारी मतांचा जोगवा मागणार्‍या नेत्यांनी या महामारीत जनसेवेकडे पाठ फिरविली आहे. राहुरी व देवळाली प्रवरातील नगरसेवकही आपआपल्या वार्डात फिरकत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, राहुरी शहरात दिवसेंदिवस करोनाबाधित रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, दोन्हीही शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे.

गेल्या महिन्याभरापासून दोन्हीही शहरात कोणतीही निर्जंतूक फवारणी करण्यात आलेली नाही. तुंबलेल्या गटारींकडे पाठ फिरवून स्वच्छतेच्या अभावामुळे उकिरडेही वाढले आहेत. त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढून नागरिकांना साथीच्या आजाराची शक्यता बळावली आहे. मात्र, त्याकडे दोन्हीही नगरपालिकांच्या नगरसेवकांनी पाठ फिरविल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. वार्डात नगरसेवक दाखवा, अन् बक्षीस मिळवा, अशी घोषणाबाजी करण्याची वेळ नागरिकांवर येणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com