करोना लससाठी नगरमध्ये रास्ता रोको

करोना लससाठी नगरमध्ये रास्ता रोको

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू केले. नगर शहरात पाच केंद्रावर हे लसीकरण सुरू आहे. सलग तिसर्‍या दिवशी लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाल्याचे दिसले. मनपाच्या महात्मा फुले आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्यांना लस न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी जोपर्यंत लस मिळणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी भावना येथे आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी बोलून दाखवली. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा गोंधळ उडाला. पोलिसांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. यातूनच करोना प्रतिबंधात्मक नियमाचा फज्जा उडाला. सुरक्षित अंतराच्या नियमाचे उल्लंघन या आंदोलनामुळे झाले.

महापालिकेच्या आरोग्य केंद्रात यापूर्वी 45 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात आली. यामध्ये नागरिकांना पहिला डोस देण्यात आला. एकाबाजुला 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरणाचा दुसरा डोस देणे बाकी आहे. याचे कुठल्याही प्रकारचे योग्य नियोजन मनपाकडे नाही. तर दुसर्या बाजूला 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण व नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

उपलब्ध लसीकरण डोस हे कमी प्रमाणात प्राप्त होत असल्याने एकुणच मनपास्तरावर करोना लस मोहिमेचा बोजवारा उडाला असल्याचे पहावयास मिळत आहे. आरोग्य कर्मचार्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कर्मचारीही आमच्याकडे डाटा उपलब्ध नाही, नोंदणी सर्व्हर डाऊन आहे. डाटा करप्ट झाला आहे, अशी कारणे नागरिकांना सांगत आहे. यामुळे गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे.

आ. जगतापांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

करोनाच्या मोफत लसीकरणात तांत्रिक अडथळे येत असून ते केंद्र सरकारशी बोलून दूर करा, अशी मागणी करणारे पत्र नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे. करोनाच्या मोफत लसीकरणापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून अनेक ग्रामीण भागातील तरुणांकडे मोबाईलच नाहीत. त्यामुळे त्यांची नोंदणी होत नाही. ते लसीकरणापासून वंचित राहत आहेत. 18 ते 45 वयोगटासाठी शासनाने मोफत लसीकरण सुरू केले असले तरी केंद्र सरकारच्या जाचक अटीमुळे अनेकांना वंचित रहावे लागत आहे. ही जाचक अट केंद्र सरकारशी बोलून दूर करावी अशी मागणी आ. जगताप यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com