कोणी लस घेता का लस?

कोणी लस घेता का लस?

उंबरे (दत्तात्रय तरवडे)

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट ठरविण्यात आले असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मिशन कवच कुंडल' या मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. दि. १५ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू असून हे अभियान राहुरी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे.

मात्र, राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात कोविड लस घेण्यासाठी मोठी अनास्था निर्माण झाली आहे. लस आहे पण घेणारे नाहीत, अशी अवस्था तालुक्यात झाली आहे. त्यामुळे शिल्लक लस अन्य केंद्रावर पाठवावी लागत आहे. एकीकडे करोनाग्रस्तांचा करोनाग्रस्तांचा आकडा तालुक्यात खालीवर होत असतानाच लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याने आरोग्य विभाग चिंतेत पडला आहे. दरम्यान, राहुरी तालुक्यात लसीकरणाचा वेग मंदावल्याने कोणी लस घेता का लस' असे म्हणण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर शासन लस उपलब्ध करून देत आहे. मात्र, नागरिक लस घेण्यासाठी उपकेंद्रावर येत नाही. तालुक्यात तीन लाख लोकसंख्या असून त्यामध्ये अठरा वर्षांढील पात्र लाभार्थी संख्या २ लाख १९ हजार असून त्यापैकी १ लाख १७ हजार २८५ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सरासरी ५३ टक्के लसीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थी १ लाख दोन हजार असून त्यांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु अनेक ठिकाणी ग्रामीण भागात व दुर्गम भागांमध्ये नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसून त्यांना अजून लसीकरणाचे महत्त्व पटलेले दिसत नाही. अनेक ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी लसीकरणासाठी घरोघरी माहिती देण्यासाठी जात असताना अनेकांची ही माहिती ऐकून घेण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे आता आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी लसीकरणाबाबत हतबल झाले आहेत.

मात्र, त्यांना वरिष्ठांकडून लसीकरण पूर्ण झाल्याची ताकीद मिळत आहे. परंतु गाव पातळीवर ग्रामपंचायत, तलाठी, हे मात्र, पुढे आलेले दिसत हे नाहीत. अनेक गावांमध्ये २०० ते ५०० इतकेच लसीकरण होत आहे. ज्यावेळी लस उपलब्ध नव्हती, त्यावेळी अनेक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी वाद निर्माण झाले. परंतु आता लस शिल्लक आहे तर ती घेण्यासाठी कोणी पुढे येत नाही. ही शोकांतिका राहुरी तालुक्यात निर्माण झाली आहे.

"मिशन कवच कुंडल' या मोहिमेतून कोविड लसीकरण वेग वाढविण्याचा निर्णय शासनाचा आहे. तालुक्यातील १०० टक्के पात्र अठरा वर्षाच्या पुढील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. त्यामध्ये गरोदर स्तनदा माता यांचेही लसीकरण होणे गरजेचे आहे. प्रत्येक आरोग्य विभागामार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लस टोचण्याचे काम करण्यात येणार आहे. तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांच्यावर लाभार्थ्यांना आरोग्य विभागापर्यंत लसीकरणासाठी घेऊन येण्याची जबाबदारी आहे. या सर्व कमिटीचा समन्वय असल्यास मिशन कवचकुंडलचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास तालुक्यात विलंब लागणार नाही.

डॉ. दिपाली गायकवाड, आरोग्य अधिकारी, राहुरी पंचायत समिती.

निवडणुकीत प्रत्येक प्रभागांमध्ये उमेदवार उभे असतात. त्यावेळी मतदान घडवून आणण्यासाठी जसे आपले राजकीय कसब पणाला लावतात. त्याच पद्धतीने ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्येक प्रभागनिहाय आपली ताकद पणाला लावून लसीकरण घडवून आणले तर निश्चितच एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहणार नाही व आरोग्य विभागालाही त्याचा फारसा त्रास होणार नाही. नगरपालिकेच्या नगरसेवकांसह ग्रामपंचायत सदस्यांनी प्रभागनिहाय लसीकरणाची यादी काढून उर्वरित नागरिकांना लसीकरणासाठी सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.