करोना लसीकरणात राहाता तालुका अव्वल!

19 गावांत 100 टक्के लसीकरण, करोनाचे 211 रुग्ण सक्रीय
करोना लसीकरणात राहाता तालुका अव्वल!

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

तालुक्याचा करोना लसीकरणाचा दर 92 टक्के इतका असल्याने तालुका लसीकरणात अव्वल ठरला आहे.पहिला डोस तालुक्यातील 18 च्या वरील 2 लाख 31 हजार 594 व्यक्तींनी घेतला आहे. दुसरा डोस 1 लाख 66 हजार 320 व्यक्तींनी घेतला आहे. बुस्टर डोस आतापर्यंत 6163 व्यक्तींनी घेतला तर शालेय विद्यार्थ्यांनी 15 ते 17 वयोगटातील 18 हजार 197 जणांनी घेतला आहे. असे तालुक्यात एकूण 4 लाख 22 हजार 274 डोस देण्यात आले आहेत. राहाता तालुक्यात पहिल्या डोसचा दर 92 टक्के तर राज्याचा करोना लसीकरणाचा दर 90.49 टक्के, नगर जिल्ह्याचा करोना लसीकरणाचा दर 83.26 टक्के आहे. त्यामुळे राहाता तालुका राज्यात, नगर जिल्ह्यात पहिल्या डोसची संख्या पाहता अव्वल ठरला आहे.

करोना लसीकरणात दुसरा डोस 1 लाख 66 हजार 320 जणांनी घेतला. हे प्रमाण 66 टक्के इतके आहे. शाळकरी मुलांना लसीकरण सुरू आहे. काल 22 फेब्रुवारी अखेर आतापर्यंत 18 हजार 197 जणांनी करोनाची लस घेतली. लसीकरणाला महत्त्व असल्याने तालुका प्रशासन, आरोग्य विभाग यांनी वेळोवेळी लसीकरण घेण्याचे आवाहन केले आहे.

राहाता तालुक्यात काल अखेरपर्यंत 100 टक्के करोना लसीकरण झालेल्या गावांची संख्या 19 इतकी आहे. यामध्ये मोरवाडी, चोळकेवाडी, तरकसवाडी, राजुरी, पिंपरी निर्मळ, रांजणगाव, दुर्गापूर, डोर्‍हाळे, नांदुर्खी खुर्द, केलवड खुर्द, आडगाव खुर्द, पिंप्री लोकई, सावळीविहीर बुुद्रुक, निमगाव, धनगरवाडी, एलमवाडी, चितळी, नांदूर खुर्द, नपावाडी या गावांचा समावेश आहे.

तालुक्यात बुधवार दि. 23 फेब्रुवारी पर्यंत 211 करोना रुग्ण सक्रिय होते. काल अखेर तीनही टप्प्यात एकूण 28 हजार 538 करोना बाधित रुग्ण तालुक्यात होते. त्यातील 27 हजार 823 रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्याचा बरा होण्याचा दर 97 टक्के आहे. करोनाने तालुक्यातील 504 जणांनी आपले प्राणही गमावले आहेत. कालपर्यंत एकूण 1 लाख 71 हजार 625 जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली तर आरटीपीसीआर 1 लाख 46 हजार 329 इतकी करण्यात आली. एकूण 3 लाख 17 हजार 954 जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 1 मार्च 2020 ते 22 फेब्रुवारी 2022 या कालखंडातील ही आकडेवारी आहे. काल 1 ते 5 रुग्ण सक्रिय असलेल्या गावांची संख्या 25 इतकी आहे. त्यात पाथरे, पिंपळस, बाभळेश्वर बु., हनुमंतगाव, पिंप्रीनिर्मळ, दाढ बु., गोगलगाव, कनकुरी, कोर्‍हाळे, साकुरी, सावळीविहीर बु., वाकडी, मोरवाडी, चोळकेवाडी, ममदापूर, एकरुखे, केलवड बु., लोहगाव, रुई, पिंपळवाडी, शिंगवे, धनगरवाडी, रास्तापूर, नांदुर बु., नपावाडी या गावांचा समावेश आहे.

4 गावात 6 ते 10 इतक्या संख्येने करोना रुग्ण सक्रिय आहेत. त्यात चितळी, दुर्गापूर, अस्तगाव, कोल्हार बु. या गावांचा समावेश आहे. तर 11 ते 20 सक्रिय रुग्ण शिर्डी येथे आहेत. तर 21 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण राहाता, लोणी बु., लोणी खुर्द, पुणतांबा या गावात आहेत. तर अन्य 26 गावांत एकही सक्रिय रुग्ण काल नव्हता. त्यात तरकसवाडी, राजुरी, रांजणगाव, हसनापूर, चंद्रपूर, डोर्‍हाळे, नांदुर्खी बु., नांदुर्खी खु,, वाळकी, केलवड खुर्द, दहेगाव, खडकेवाके, आडगाव बु., आडगाव खुर्द, पिंप्रीलोकई, भगवतीपूर, बाभळेश्वर खुर्द, तिसगाववाडी, सावळीविहीर खुर्द, निमगाव, निघोज, जळगाव, एलमवाडी, रांजणखोल, नांदूर खुर्द, रामपूरवाडी या गावांचा समावेश होतो.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com