फुकटच्या करोना लसीकरणाकडे नगरकरांची पाठ !

50 दिवसांत अवघ्या 5 टक्के लोकांनी घेतली कोविड लस
फुकटच्या करोना लसीकरणाकडे नगरकरांची पाठ !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देशाच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करतांना सरकारने कोविडपासून नागरिकांची संरक्षण व्हावे, यासाठी 15 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत मोफत करोना लसीकरणांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र, या कलावधीत अवघ्या 5.32 टक्के लोकांनी कोविडचा बुस्टर डोस घेतला असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

जिल्ह्यात कोविडपासून संरक्षण मिळावे, यासाठी आरोग्य खात्याने 39 लाख 96 हजार 991 लोकांचे करोना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. 18 ते 60 आणि पुढे ज्येष्ठ नागरिकांचा यात समावेश होता. सुरूवातीला कोविडच्या दुसर्‍या लाटेनंतर नागरिकांनी मोठ्या संख्याने गर्दी करून कोविड कवच म्हणून करोनाची लस घेतली. मात्र, कोविडची दुसरी लाट ओसरल्यानंतर हळूहळू करोना लसीकरणाकडे नगरकरांनी कानाडोळा केल्याचे दिसत आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 34 लाख 12 हजार 420 नागरिकांनी करोनाचा पहिला डोस घेतलेला आहे. याची टक्केवारी 85.37 टक्केच आहे. तर दुसरा डोस घेणारे 26 लाख 96 हजार 706 असून त्यांची टक्केवारी ही 67 टक्के आहे. तर बुस्टर डोस घेणारे 2 लाख 12 हजार 640 जण असून त्यांची टक्केवारी ही 5.32 आहे. सरकारने स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करतांना 15 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत मोफत करोना लसीकरण करण्याचे जाहिर केलेले आहे. मात्र, मोफत देवू केलेल्या करोनाच्या लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. एकतर करोनाची संपलेली भिती हे या मागील प्रमुख कारण असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे.

ज्येष्ठांनी घेतला 100 टक्के पहिला डोस

जिल्ह्यात 60 वर्षापुढील 5 लाख 73 हजार 400 नागरिकांपैकी शंभर टक्के लोकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. मात्र, दुसर्‍या डोसची टक्केवारी ही 82.92 टक्के असून बुस्टर डोसचे प्रमाण हे अवघे 15.70 टक्के आहे.

जिल्ह्यात आरोग्य कर्मचार्‍यांपैकी 45 हजार 668 जणांनी पहिला, 42 हजार 668 जणांनी दुसरा, फ्रंटलाईन वर्करपैकी 60 हजार 184 यांनी पहिला तर 56 हजार 300 जणांनी दुसरा डोस घेतलेला आहे. 18 ते 45 वयोगटातील 22 लाख 17 हजार 900 पैकी 17 लाख 21 हजार 89 जणांनी पहिला, 13 लाख 13 हजार 977 जणांनी दुसरा तर 49 हजार 215 जणांनी बुस्टर डोस घेतलेला आहे. 45 ते 60 वयोगटातील 8 लाख 12 हजार 300 पैकी 6 लाख 84 हजार यांनी पहिला, 5 लाख 72 हजार यांनी दुसरा तर 39 हजार 878 जणांनी बुस्टर डोस घेतला असून त्यांची टक्केवारी 15.70 टक्के आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com