करोना उपचार; दिवसाला 4 ते 9 हजारांपर्यंत सरकारी दर निश्चित
सार्वमत

करोना उपचार; दिवसाला 4 ते 9 हजारांपर्यंत सरकारी दर निश्चित

राज्य शासनाने ठरवून दिलेले दर आकारण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील ज्या खासगी रुग्णालयांमध्ये करोना आजारावर उपचार करण्यात येत आहेत, अशा रुग्णालयांनी रुग्णाकडून राज्य शासनाने ठरवून दिलेलेच शुल्क आकारावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. दरम्यान, शासनाच्या दरानुसार खासगी रुग्णालयाला हे दर दिवसाला 4 हजार, 7 हजार 500 व 9 हजार रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयेही करोना आजारावर उपचार करत आहेत. अशा रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, तसेच अवास्तव शुल्क त्यांच्याकडून आकारले जाऊ नये, यासाठी राज्य शासनाने अशा रुग्णालयांसाठी उपचाराच्या अनुषंगाने दर निश्चित करून दिले आहेत.

या रुग्णालयांनी करोना उपचाराच्या संदर्भातील हे दरपत्रक त्यांच्या रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावावेत. जेणेकरून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्याची माहिती होऊ शकेल. तसेच महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत निकषानुसार पात्र असणार्‍या रुग्णांवर मोफत उपचार करावेत,असे स्पष्ट करण्यात आले आहे.

खाजगी रुग्णालयात करोना रुग्णांवरील उपचारासाठी दर निश्चित केले आहेत. त्यात साधे बेड, फक्त ऑक्सिजनची सुविधा आणि अतिदक्षता विभागातील बेड यासाठी दर निश्चित केले आहेत.

त्यामुळे या आदेशानुसार खासगी रुग्णालयांनी सेवा दिल्याच पाहिजे असे बंधनकारक आहे. या आदेशानुसार करोनाच्या रुग्णांसाठी दर आकारणीचे तीन स्तर ठरविण्यात आले असून दर दिवसाला 4 हजार, 7 हजार 500 व 9 हजार रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत. सर्वसाधारण वॉर्ड आणि आयसोलेशनमध्ये रुग्ण असेल तर प्रतिदिवशी 4 हजार रुपये, आयसीयूमध्ये रुग्ण असेल आणि त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता नसेल तसेच आयसोलेशनमध्ये असेल तर प्रतिदिवशी 7 हजार 500 रुपये आणि आयसीयू वॉर्ड (व्हेंटिलेटरसह) आणि आयसोलेशन यासाठी प्रतिदिवशी 9 हजार रुपये शुल्क आकारावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पीपीई कीट, व्रान्कोस्कोपीक प्रोसीजर्स,बायोप्सीज, असायटीक/प्युरल टॅपिंग, सेंट्रल लाईन इन्सर्शन, केमोपोर्ट इन्सर्शन आदींच्या दर आकारणीचा यात समावेश नाही. हे दर 31 डिसेंबर, 2019 च्या रॅक रेटनुसार आकारावेत. उपचारासाठी वापरले जाणारे इम्युनोग्लोबुलिन्स, मेरोपेनेम, पॅरेन्ट्राल न्युट्रीशन, टॉसिलीझुमॅब आदी औषधी त्यांच्या एमआरपीनुसार स्वतंत्रपणे शुल्क आकारले जाईल. तसेच विविध चाचण्या जसे की, एमआरआय, सीटी स्कॅन, पीईटी किंवा रुग्णांवर उपचारांसाठी प्रयोगशाळेत केल्या जाणार्‍या आवश्यक चाचण्यांसाठीचे शुल्क ही स्वतंत्रपणे आकारले जाईल. त्याचा या दरआकारणीत समावेश नाही. सध्या या रुग्णालयांना तेथील सुविधानुसार जे दर ठरवून दिले आहेत. या दरांमध्ये रुग्णाचे मॉनिटरिंग, सीबीसी तसेच युरीन तपासणी, एचआयव्ही स्पॉट, अ‍ॅण्टी एचसीव्ही, युएसजी, 2 डी एको, एक्स रे, ईसीजी, बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, रायल्स ट्यूब, युरीनरी ट्रॅक्ट कॅथेटरायझेशन आदींचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com