संगमनेर | संदीप वाकचौरे| Sangmner

करोनाच्या काळात दंडकारण्य अभियान करणे शक्य नव्हते. म्हणून राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपापल्या स्तरावरती प्रत्येकाने या अभियानाच्यादृष्टीने प्रयत्न करा.

झाडे लावा. झाडे आणि पर्यावरण हाच आपल्या भविष्यासाठीचा मार्ग आहे असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी आपल्यापरीने प्रयत्न केले, पण कोळवाडे येथील वर्पे कुटुंबाने मात्र या आवाहनाला प्रतिसाद देत चक्क 30 हजार झाडे आणून शेतकर्यांना ती लावण्यासाठी प्रेरीत केले. करोनावर मात करीत पर्यावरणासाठी संवर्धनासाठी दंडकारण्य अभियान सुरू ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे आज कौतुक होत आहे.

करोनाने अवघ्या जगाचे व्यवहार बंद झाली होते. माणसं माणसांपासून दुरावली होती. अशा परीस्थितीत गेले अनेक वर्षांपासून लोकांना एकत्रित करीत दंडकारण्य अभियान चालविणे शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर प्रत्येक व्यक्तीने निसर्गाचे संवर्धन करावे. शेतावरती, गावात प्रत्येकाने झाड लावावे,असे आवाहन केले होते.

त्याला कोळवाडे येथील विठोबा वर्पे या सत्तर वर्षाच्या वृध्दांनी आणि त्यांचे चिरंजीव बाबाजी यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी गुजरातमधील नर्सरीतून केशर आंब्याची सुमारे पंचवीस हजार झाडे आणली. त्याचबरोबर चिकूची सुमारे दोन हजार व इतर लिंबू, चिंच, केळी अशी अत्यंत उत्तम जातीची झाडे आणली.

या केशर आंब्याचे झाड पन्नास रुपयांस एक याप्रमाणे व इतर झाडे ज्या भावात आणली त्याच किमतीला त्यांनी शेतकर्यांना विकले. शेतकर्यांना अत्यंत दर्जेदार व उत्तम जातीची रोपे स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने शेतकर्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आणि पाहता पाहता सर्वच रोपे संपली. यासाठी वाहतुकीला संगमनेर साखर कारखान्याने मदत केली.

करोनाचा काळ असताना देखील तालुक्यात दंडकारण्य अभियानाच्या निमित्ताने सुरू झालेली परंपरा वर्पे यांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीने कायम सुरू ठेवली. नामदार थोरात यांच्या आवाहनास असा प्रतिसाद मिळेल अशी कोणी अपेक्षाही केली नसेल मात्र हा प्रतिसाद निश्चित कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

संगमनेर तालुक्यात तिर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियानाच्या निमित्ताने झाडे लावण्याची चळवळ उभी केली. त्या चळवळीचा विचार आता गावागावांत रूजला आहे. तो विचार घेऊन सध्याच्या करोनाच्या काळात वर्पे कुटुंबानी ना. थोरात यांच्या आवाहनाला वेगळ्या स्वरूपाचा प्रतिसाद देत केलेले कार्य म्हणजे विचारांची पेरणी झाली आहे. आता ही चळवळ घराघरांतील माणसापर्यंत पोहचली आहे. या निमित्ताने तालुक्यात सुमारे तीस हजार झाडांच्या होणार्या लागवडीने पर्यावरणाचे रक्षण होण्याबरोबर तालुक्यात फळांच्या उत्पन्नात देखील वाढ होईल.
- आ. डॉ. सुधीर तांबे

खरेतर भाऊसाहेब थोरात यांनी पेरलेला विचार हा समाजाचे भले करणारा आहे.त्यामुळे करोनाच्या काळात देखील त्यांनी पेरलेले उगवायला हवे त्यादृष्टीने ना. थोरात यांनी आवाहन केले होते. त्यादृष्टीने आमच्या परिवाराने एकत्रित येऊन निसर्गाचे संवर्धन करण्याचा विचार केला. त्यामुळे सुमारे 30 हजार झाडे गुजरात राज्यातून आणले. ते ज्या भावात खरेदी केले त्याच भावात येथे दिले. मुलतः पैसे देऊन एखादे झाड विकत घेतले की लोक त्याचे मनापासून जतन व संवर्धन करतात. म्हणून ती मोफत न वाटता ज्यांना हवी त्यांनी ती विकत घेतली. यामुळे तालुक्यात यावर्षी या माध्यमातून तीस हजार झाडे लावून दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून जतन करण्याचे समाधान मिळाले.
- विठोबा वर्पे-शेतकरी