शिर्डीत घरोघरी जाऊन करोनाच्या चाचण्या

शिर्डीत घरोघरी जाऊन करोनाच्या चाचण्या

शिर्डी (शहर प्रतिनिधी) - राज्यात स्वच्छता तसेच माझी वसुंधरा अभियानात प्रथम क्रमांक पटकवणार्‍या शिर्डी नगरपंचायतच्या माध्यमातून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करत सद्य स्थितीत शहरात करोनाग्रस्तांची संख्या नगण्य असून नगरपंचायतचे पथक मागील आठ दिवसांपासून घरोघरी जाऊन आरटीपिसीआर तसेच रॅपिड चाचण्या करून घेत आहे.

काल सकाळी नांदुर्खी रोडलगत असलेल्या उपनगरात घेतलेल्या चाचण्यांमध्ये एकही पाँझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे अशा प्रकारे जास्तीत जास्त चाचण्या करून शिर्डी करोनामुक्त करण्यासाठी नागरीकांनी स्वताःहून पुढे यावे, असे आवाहन नगरपंचायतच्या माध्यमातून केले आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत शिर्डी शहरात करोना संसर्ग वाढू नये यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दक्षता घेत शहरात वेळोवेळी हायपोक्लोराईड फवारणी तसेच सोशल डिस्टंसींग, हाथ स्वच्छ धुवावेत, तोंडाला मास्क लावावा तसेच लॉकडाऊन काळात विनाकारण बाहेर पडू नये अशा प्रकारे जनजागृती करण्यात आली. तसेच मोफत आरटीपीसीआर व रॅपिड चाचण्या करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेण्यात आला. या पार्श्‍वभुमीवर मागील आठ दिवसांपासून नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक नेमून विविध भागातील उपनगरात सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत चाचण्या करून घेतल्या जात आहे. काल शनिवारी सकाळी नांदुर्खी रोडलगत पंढरिनाथ नगर, साईप्रयागा नगर, दत्तकिरण कॉलनी या भागातील नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये एकही रुग्णाची चाचणी अहवाल पाँझिटीव्ह आला नाही.

दरम्यान शिर्डी शहर करोनामुक्त होण्याच्या मार्गावर असून खबरदारी म्हणून नगरपंचायत प्रशासन सतर्कता बाळगून आहे. याप्रसंगी नगरपंचायतचे इंजिनिअर अमोल बत्तीसे, अधिकारी गोरक्ष राऊत,अंजली कोते, जयश्री आसणे, शुभम भालके आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com