लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीच्यावतीने 197 व्यावसायिकांची करोना चाचणी

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीच्यावतीने 197 व्यावसायिकांची करोना चाचणी

लोणी (प्रतिनिधी) - कोविड रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने छोटे व्यवसायिक, दुकानदार आणि व्यापार्‍यांची कोविड चाचणी करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे. कोविड टेस्ट निगेटीव्ह येणार्‍यांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी शासन नियमाप्रमाणे देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.

विविध व्यवसायांच्या निमित्ताने दुकानांमधून तसेच भाजी खरेदी करण्यासाठी येणार्‍या नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने नियमावली तयार केली. या नियमावलीचा एक भाग म्हणूनच व्यावसायिकांची कोविड टेस्ट करून घेण्याची सूचना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना केली होती. या उपक्रमातून रुग्णांचा शोध घेणेही सोपे झाले.

ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून कोविड टेस्टचा सामूहिक उपक्रम राबविला. दिवसभरात 197 छोटे व्यावसायिक, भाजी विक्रेते आणि व्यापार्‍यांची कोविड चाचणी करण्यात आली. यामध्ये अवघा एक रुग्ण कोविड पॉझिटीव्ह आढळून आला. ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी केलेल्या आवाहनाला सर्व व्यापारी, भाजी विक्रेते आणि छोट्या व्यापार्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीपाद मैड, डॉ. कापसे, डॉ. आकाश अंत्रे, स्नेहा लोनकर, एस. जी. वाड, श्री. भोसले, शुभम शिंदे, शहाबान सय्यद, सुनील खाडे यांनी कोविड टेस्ट करण्यासाठी सहकार्य केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, रामभाऊ विखे, दिलीपराव विखे, भाऊसाहेब धावणे, लक्ष्मण बनसोडे, अनिल विखे, प्रविण विखे, संभाजी विखे, गोरक्ष दिवटे, कैलास विखे, मयुर मैड, सरोज साबळे, ग्रामविकास आधिकारी कविता आहेर आदी प्रयत्नशील आहेत.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व्यावसायिकांची कोविड टेस्ट करून घेण्याचा उपक्रम ग्रामपंचायतीने राबविला. या उपक्रमामुळे सर्वांच्याच मनातील कोविडची भीती दूर झाली. गावातील रुग्णसंख्या रोखण्यातही या उपक्रमाची मोठी मदत झाल्याचे उपसरपंच गणेश विखे यांनी सांगितले. शासन नियमाप्रमाणेच व्यवसाय सुरू करताना गर्दी रोखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com