Corona
Corona
सार्वमत

करोना : सोनईत डॉक्टरचा, शिर्डीत व्यापार्‍याचा मृत्यू

सोनईत एकाच दिवसात 15 संक्रमित

Arvind Arkhade

सोनई|वार्ताहर|Sonai

येथील सुतारनेहा भागात वास्तव्य करणार्‍या एका डॉक्टरचा अहमदनगर येथील खासगी दवाखान्यात करोनावर औषधोपचार घेत असताना रविवारी सकाळी मृत्यू झाला. या डॉक्टरांच्या मृत्यूमुळे सोनई परीसरात भीतीचे वातावरणात अधिक भर पडली आहे.

सोनई गावात आता रुग्णवाहिकाचे सायरन गल्लीत वाजू लागताच सर्व स्री पुरुष गॅलरीतून ‘आता कोण?’ याची पाहणी करू लागलेले आहेत तसेच प्रशासन आरोग्य विभागातही आता अधिक काळजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सोनईतील मयत डॉक्टर हे कारखाना वाहनतळ भागात खासगी प्रॅक्टिस करत होते.

परंतु गेल्या आठ-दहा दिवसांपासून त्यांना ताप होता म्हणून त्यांनी सोनईतील कौतुकी नदी कमानीजवळचे एका खासगी दवाखान्यात औषधोपचार घेतलेले होते परंतु तेथे फरक न झाल्याने त्यांना अहमदनगरचे एका खासगी लॅबमध्ये त्यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा यांची स्राव तपासणी करण्यात आली. पती-पत्नीचे अहवाल पॉझिटीव्ह तर मुलगा निगेटिव आल्याची माहिती मिळाली. दोन दिवसापूर्वी डॉक्टर व त्यांची पत्नी यांना अहमदनगरचे खाजगी दवाखान्या शेजारी सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये औषधोपचारासाठी दाखल केले होते परंतु रविवारी सकाळी निधन झालेने प्रशासन यंत्रणा सोनईत येऊन धडकली. या डॉक्टरांचे गल्लीतील लोकांचे रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या आहेत दरम्यान सोनई कमानी शेजारचा दवाखाना व मेडिकल स्टोअर्स बंद करण्याच्या सूचना नेवासा तहसीलदार यांनी दिलेल्या आहेत

अशी होते अ‍ॅन्टीजन रॅपिड तपासणी

सोनईची सावता गल्ली व सुतारनेहा भागातील व्यक्तींची नाकातील थेंब किट वर घेऊन अ‍ॅण्टीजन तपासणी करण्यात आली असून यातील 8 जणांची तपासणीत पॉझिटीव्ह आढळल्याची माहिती असून त्या 8 जणांचे घशातील स्त्राव घेऊन करोना बाधित बाबत तपासणी होणार आहे.

‘गोल्डन मेमरी’ची मदत

क्वारंटाईन साठी गोल्डन मेमरी ग्रुप मार्फत भोजन, नाष्टा यांची सोय करण्यात आली आहे. सोनई येथील एका शिक्षण संस्थेत 37 जणांचे विलगीकरण केले असून त्या सर्वांची आर्थिक परिस्थिती नाजूक असलेने मजुरीवर काम करणार्‍या या क्वारंटाईन व्यक्तींची प्रशासनाकडून चहा नाश्ता भोजन व्यवस्था होत नसल्याने सोनईचे हायस्कूल 88-89 बॅचचे माजी विद्यार्थी गोल्डन मेमरी ग्रुप मार्फत चहा-नाश्ता भोजन व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती या ग्रुपचे सदस्य नितीन दरंदले यांनी दिली.

सोनई मध्ये करोनाचा कहर झाला असल्याने सर्वत्र हॉटस्पॉट क्षेत्रात दुकाने बंद आहेत. त्यामुळे घोडेगाव बाजारपेठेत सोनई परिसराचे ग्राहकांची खरेदीची सोय झाली आहे. काही लोक घोडेगाव बंद करण्याची मागणी करत होते. परंतु घोडेगाव व्यापारी वर्गाने एकत्रित बैठक घेऊन आम्ही सर्व शासकीय आदेश पाळून व्यवसाय करीत आहोत आमच्याकडून भंग झाल्यास कारवाई करावी परंतु सकाळी 9 ते 5 या काळात सुरू असणारे व्यवसाय बंद करू नयेत अशी मागणी स्थानिक ग्रामपंचायत व करोना कमिटीकडे केलेली आहे.

- राजेंद्र देसरडा सरपंच, घोडेगाव

शिर्डीत करोनाचा पहिला बळी

शिर्डी|शहर प्रतिनिधी|Shirdi

शिर्डी शहरात करोनाने पहिला बळी घेतला असून शहरातील प्रसिद्ध व्यापारी शांतिलाल गंगवाल यांचा शनिवारी रात्री करोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल रविवारी पुन्हा नव्याने 5 जणांना करोनाची बाधा झाली आहे. आठवडाभरात शहरात करोनाने अर्धशतक गाठले आहे. दरम्यान काल दिवसभरात 41 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांचे स्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे नगरपंचायतचे नोडल अधिकारी मुरलीधर देसले यांनी सांगितले.

शिर्डी शहरात मागील आठवड्यापासून करोनाचा शिरकाव झाला असून आतापर्यंत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या पन्नासपर्यत जाऊन पोहचली आहे. काल रविवारी पुन्हा चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्यांच्या संपर्कातील 41 व्यक्तींना साईआश्रम फेज 2 येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

शहरात करोनाग्रस्तांची रुग्णांची संख्या अर्धशतकापर्यत जाऊन पोहचल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहे. साईबाबा संस्थानच्या सुपर रुग्णालयातील आसपासच्या परिसरातील 18 कर्मचार्‍यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या या चार महिन्याच्या काळात जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या दिड हजारांंवर जावून पोहचली. गेल्या एक महिन्यात बाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून दररोज पन्नास बाधितांची भर पडताना दिसून येत आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत 38 बाधितांचा मृत्यू झाला असून राहाता तालुक्यात 3 यामध्ये शिर्डी शहरातील पहिलाच बाधिताचा मृत्यू झाला आहे. दिवसाकाठी वाढणार्‍या रुग्णांंच्या संख्येबरोबरच बरे होवून घरी जाणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे. आत्तापर्यंत 1 हजार 25 बाधित बरे झाले आहे. तालुक्याबरोबर शिर्डी शहरातील बाधितांची वाढती संख्या पाहता अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, जेणेकरुन करोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. घरात राहुन अतिमहत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका. तसेच बाहेर आल्यानंतर आवश्यक ती काळजी घेवून प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांनी केले.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com