करोना : श्रीरामपुरात 2 अकोलेत एकाचा मृत्यू

Corona
Corona

एक राजकीय पदाधिकारी तर दुसरी महिला

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

करोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर नगर येथे उपचार घेत असलेल्या 60 वर्षीय व्यापार्‍यासह वॉर्ड नं. 6 परिसरातील एका 68 वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला आहे. तर काल चार जणांचे करोना पॉझिटीव्ह अहवाल आले आहेत. तालुक्यातील 90 अहवालाची प्रतिक्षा असून आतापर्यंत तालुक्यात 143 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झाली आहे.

काही दिवसापूर्वी शहरातील एका पक्षाच्या सेलचा 60 वर्षीय पदाधिकार्‍यास करोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर काही दिवस श्रीरामपुरातील संतलुक रुग्णालयात उपचार सुरु होते. दुसर्‍या दिवशी त्यांच्या कुटुंबातील चौघांचेही करोना बाधित अहवाल आले. या पदाधिकार्‍यास पुढील उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुुरु असताना काल पहाटे पावणे दोन वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वॉर्ड नं. 7 मधील बेलापूर रोड वेशीजवळ राहत असलेल्या 73 वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तिला खासगी रुग्णालयात उपचारसाठी नेले मात्र करोना टेस्ट केल्याशिवाय कोणत्याही दवाखान्यात दाखल करून घेतले जात नव्हते. याबाबत माहिती मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांना संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी सांगितली.

खोरे यांनी तात्काळ डॉ.वसंत जमदाडे यांना संपर्क करत टेस्ट करण्याची मागणी केल्याने संबंधित महिलेची रॅपिड टेस्ट करण्यात आली. ती पॉझिटिव्ह निघाल्याने सेंटलूक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी सदर महिलेला नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. नगरसेविका स्नेहल खोरे यांनी स्वतः लक्ष घालत सदर परिसर नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या मदतीने परिसर निर्जंतुकीकरण करून घेतला आहे. श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5 वर जावून पोहोचला आहे.

काल आलेल्या अहवालात चार जणांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला. यात तालुक्यातील उंबरगाव येथील 32 वर्षीय तरुणाचा समावेश असून तर शहरातील वॉर्ड नं. 6 मधील एका 90 वर्षीय वृध्देसह वॉर्ड नं. 7 मधील 78 वर्षीय वृध्दाचा व वॉर्ड 7 मधील एकाचा समावेश आहे. या दोघांवरही संतलुक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या कुटुंबातील काही जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे आता करोनाबाधितांची संख्या 140 वर जावून पोहोचली असून काल करोनावर मात करुन दोघेजण घरी परतले आहेत.

आज 28 जणांचे स्त्राव घेवून तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत 709 जणांचे स्त्राव घेण्यात आले आहेत. आज तिघा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत 420 जणांचे अहवाल निगेटीव्ह अहवाल आले आहेत.

चुकीचे पत्ते दिल्याने संताप

करोना चाचणीसाठी स्त्राव घेतलेले अनेकजण चुकीचा पत्ता देत असल्याने अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांचा शोध घेणे प्रशासनास अवघड होत आहे. तर काही चुकीच्या पत्त्यामुळे त्या भागातील नागरिकांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यात प्रवरा हौसिंग व वढणे वस्ती भागात रुग्ण नसताना चुकीच्या पत्त्यामुळे तेथील नागरिकांकडे लोक संशयाने पाहत असल्याने या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

गळनिंब येथील महिलेचा करोना अहवाल येण्याअगोदरच मृत्यू

श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील एका महिलेस त्रास होत असताना तिला तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिला नगर येथे पाठविले असता तिचा स्त्राव घेवून तिची तपासणी करण्यात आली. मात्र अहवाल येण्याअगोदरच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिचा मृत्यू करोनामुळे झाला की नाही हे निश्चित नाही. तो अहवाल कधी येतो यावरच तिच्या मूत्यूचे कारण कळू शकणार आहे.

अकोलेत तिसरा बळी

अकोले|प्रतिनिधी|Akole

अकोले तालुक्यात करोनाचा केळी येथील 75 वर्षीय वृद्धाच्या रुपाने तिसरा बळी गेला आहे. तालुक्यातील विरगाव येथील एक 12 वर्षाच्या मुलीचा करोना अहवाल काल पॅाझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 74 झाली आहे. दरम्यान शहरातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यासह अन्य सहा जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहे. तालुक्याच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे.

काल बुधवारी अकोले तालुक्यात दिवसभरात 7 रुग्ण बाधित आढळले होते. काल गुरुवारी सकाळीच अकोले शहरातील 6 रुग्णांनी करोना वर मात केली असुन त्यांना खानापुर येथील कोव्हिड सेंटर मधून त्यांना सोडण्यात आले. शहरातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याचे घरी येताच त्यांना पुष्पहार घालत समर्थकांनी ढोल- फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले. यामुळे संबंधित पदाधिकारी काही वेळ हरखून गेले.

तर तालुक्यातील केळी (गोडेवाडी) येथील मुंबईहुन आलेल्या 75 वर्षीय वृद्धाचा नाशिक येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. या व्यक्तीच्या रुपाने तालुक्यातील करोनाचा तिसरा बळी गेला आहे.सदर 75 वर्षीय व्यक्ती मुंबई वरुन तालुक्यातील केळी (गोडेवाडी) या गावी आल्यानंतर त्रास जाणवू लागल्याने अहमदनगर येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्याचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला होता.

त्यानंतर तो नाशिक येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत होता. काल मध्यरात्री उपचारा दरम्यान सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आता तालुक्यात रुग्णांची संख्या एकुण 74 झाली आहे. त्यापैकी 45 जण करोना मुक्त झाले. तर 3 मयत झाले असून सध्या 29 जणांवर उपचार सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com