करोना नियमांचे पालन करत सवार्‍यांचे जागेवरच विसर्जन

हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्याचे प्रतीक : यंदा मिरवणुकीवर बंदी
करोना नियमांचे पालन करत सवार्‍यांचे जागेवरच विसर्जन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्याचे प्रतीक असलेले आणि मुस्लिमांच्या इस्लामी वर्षाचा पहिला महिना असलेला मोहरम यंदा करोना संकटात शांततापूर्ण वातावरणात पार पडला.

करोना नियमांचे पालन करीत मुस्लिम बांधवांनी कोठला भागात सवार्‍यांचे रविवारी जागेवरच विसर्जन केले. दरवर्षी बडे आणि छोट्या इमामांच्या सवार्‍यांची शहरामधून मिरवणूक काढून विसर्जन केले जाते.

यंदा मात्र करोना संकट असल्याने प्रशासनाने मिरवणुकीवर बंदी घातली होती. यामुळे जागेवरच विसर्जन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नगरचा मोहरम देशात प्रसिद्ध आहे. दरवर्षी मोहरमसाठी देशासह राज्यातून भाविक नगरमध्ये येत असतात. यंदा करोनाचे संकट असल्याने धार्मिक उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी सर्व नियमांचे पालन करीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासनाला सहकार्य केले.

मंगळवारी कोठला येथील छोटे इमाम आणि हवेली येथील बडे इमाम यांच्या सवारीची स्थापना झाली होती. रविवारी जागेवर मिरवणूक काढण्यात आली व त्याच ठिकाणी त्या विसर्जित करण्यात आल्या. छोटे इमाम यांची सवारी सव्वा बारा वाजता तर बडे इमाम यांची सवारी दीड वाजता विसर्जित करण्यात आली.

सवारी विसर्जनासाठी मोजक्या भाविकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासनातर्फे त्यांना पास देण्यात आले होते. त्यांचे ऑक्सिजन व तापमान तपासणी करून परवानगी देण्यात आली होती. कोठला परिसरात इतरांना प्रवेश बंदी होती. करोना नियमांचे पालन करत विसर्जन झाल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.

शहर पोलिसांचा चोख बंदोबस्त

करोना संकट असल्याने जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. विसर्जन मिरवणूक नसली तरी जागेवर सवार्‍या विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी बंदोबस्त तैनात केला होता. दोन उपअधीक्षक यांच्यासह 35 अधिकारी, 150 कर्मचारी, होमगार्ड, एसआरपीएफच्या तीन तुकड्या, आरसीपीच्या तीन तुकड्या, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोहर मिरवणुकीत दरवर्षी मोठी गर्दी होत असते. यंदा जागेवरच सवारी विसर्जित केल्याने मोजक्या लोकांना प्रवेश देण्यात आला होता. कोठला परिसरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. असे असतानाही विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न करून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला. यासंदर्भात 25 ते 30 जणांविरुद्ध भादंवि 188 , 268 ,269 अन्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com