करोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा

राहाता तहसिलदार हिरे: लसीकरण करुन घेण्याचे आवाहन
करोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

तालुक्यातील जनतेने करोना च्या संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे, ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी, श्रीरामपूर येथील पदेशातून आलेल्या व्यक्तिचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तसेच त्यांना ओमीक्रोन या विषाणुची लागण असल्याचे निष्पन्न झाल्याने वाकडी, चितळी, रांजणखोल व इतर लगतच्या गावातील ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांनी वाढता करोनाचा आणि ओमीक्रोन या विषाणू चा प्रादुर्भावाच्या शक्यतेने व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आदेश जारी केले आहेत. त्या आदेशाचे पालन करण्यासाठी राहाता तालुक्यातील जनतेने सतर्क राहावे, असे सांगुन तहसिलदार कुंदन हिरे म्हणाले, तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, खाजगी अस्थापना, कार्यालये, व्यावसायिक व औद्योगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृह, सिनेमागृह, लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व तत्सम सर्वच सार्वजनिक ठिकाणे व कार्यक्रमात नो व्हॅक्सिन, नो एंट्री, या प्रमाणे निर्बंध लागु करण्यात येत आहेत.

राहाता तालुक्यात 1 मार्च 2020 ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत 25 हजार 577 एकूण पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. त्यातील 25 हजार 63 रुग्ण बरे झाले. बरा होण्याचा दर 98 टक्के इतका राहिला आहे. एकूण स्वॅब 288393 इतके घेण्यात आले होते. पॉझिटिव्हीटी रेट 8.87 टक्के इतका होता. करोनाने एकूण मृत्यू 494 झाले. मृत्युची टक्केवारी 1.93 टक्के इतकी होती.

दुसर्‍या लाटेत 1 मार्च 2021 पासून तालुक्यात 2 लाख 55 हजार 864 स्वॅब घेण्यात आले. त्यात 20 हजार 126 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 19 हजार 677 रुग्ण बरे झाले. बरे होण्याचा दर 98 टक्के आहे. पॉझिटिव्हीटी रेट 7.87 टक्के इतका होता.दुसर्‍या लाटेत 429 रुग्णांचे मृत्यु झाले. मृत्युची टक्केवारी 2.13 टक्के इतके होते. सध्या तालुक्यात 20 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

कोव्हिड आणि ओमीक्रोन च्या पार्श्वभुमिवर तालुक्यातील जनतेने काळजी घ्यावी व स्वत:चे रक्षण करावे, व कुटूंबाची काळजी घ्यावी, सॅनिटायझर, मास्क यांचा वापर करावा, व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com