अहवाल न येताही ‘ते’ 23 जण घरी गेलेच कसे ?
सार्वमत

अहवाल न येताही ‘ते’ 23 जण घरी गेलेच कसे ?

सोनईत उलटसुलट चर्चा

Arvind Arkhade

सोनई|वार्ताहर|Sonai

सोनईतील विलगीकरण कक्षातील 23 जणांचा करोना चाचणी अहवाल आलेला नसतानाही त्यांनी घर गाठले. त्यातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे 23 जण घरी गेलेच कसे? कोणत्या यंत्रणेचे त्यांच्यावर नियंत्रण होते? याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा व संशयांना उधान आले आहे. दरम्यान काल सोनईतील क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींपैकी तिघांचे अहवाल प्राप्त झाले असून ते संक्रमित आढळून आले आहेत.

आता प्रशासन व आरोग्य यंत्रणा या 5 जणांच्या संपर्कात आलेल्या सोनई व शिंगणापूर येथील अतिजोखमीच्या संबंधितांना विलगीकरण कक्षात नेण्यात आलेले आहे. शनिशिंगणापूर ग्रामपंचायतीने बाधित एका तरुण रुग्णाच्या वस्ती भागात औषध फवारणी केली तर सोनई ग्रामपंचायतीने 4 बाधित स्त्री-पुरुषांच्या त्या गल्लीत औषध फवारणी करून ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य विभागाच्या सेविका फक्त गल्ली गल्लीतील घरांच्या रस्त्यावरून कुणी आजारी आहे काय? एवढी विचारणा करून कामाचा देखावा करीत असल्याचे दिसत आहे.

मंगळवार 14 रोजी विलगीकरण कक्षातून प्रशासनाला न विचारता घरी गेलेल्या रुग्णांना ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी पुन्हा विलगीकरण कक्षात दाखल केल्याने यंत्रणांचा गोलमाल कारभार लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे जाणवत आहे.

दरम्यान होमक्वारंटाईन असलेल्या एका ग्रामपंचायत सदस्याने सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत आरोग्य यंत्रणा कोणतीही काळजी न घेता फक्त दिखावा करीत असल्याचे सांगून प्रशासनाचे नेवासा येथील अधिकारी सुद्धा कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेत नसल्याचे म्हटले आहे.

औरंगाबादहून सोनई या आपल्या मूळ गावी आलेल्या कंपनी कामगाराच्या मुलाचे लग्न 30 जून रोजी पाथर्डी तालुक्यातील कोल्हुबाईचे कोल्हार येथे झाले. 7 जुलै रोजी तो मयत झाला त्याच्या मृत्यूबाबत करोनाचा संशय होता. सोनईत त्याच्या संपर्कात आलेले 15 जण करोनाबाधित सापडले तर कोल्हारचे ही स्राव तपासणी झाली. पाथर्डी तालुक्यातील 11 जणांना करोनाबाधा झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दराडे यांच्याकडून समजले आहे.

सोनईत 10 बाधित अहवालानंतर 102 अतिजोखमीच्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर 5 अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर 82 जण निगेटिव्ह आले होते. काल तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोनई-शिंगणापुरातील संक्रमितांची संख्या 19 वर पोहचली आहे. अद्यापही 33 अहवाल प्रतिक्षेत आहेत.

नेवासा तालुका सोनई परिसरात उद्भवलेल्या परिस्थितीवर जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख हे लक्ष ठेवून असून प्रशासनातील तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून काही सूचना दिलेल्या आहेत व काही स्थानिक पदाधिकारी यांनाही सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. नामदार गडाख यांनी अधिकार्‍यांना कडक शब्दांत आदेश दिले असून संबंधितांचे कान टोचल्याचेही समजले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com