करोनाने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान; काहींच्या स्वप्नांवर पाणी फिरले

करोनाने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान; काहींच्या स्वप्नांवर पाणी फिरले

सुपा |वार्ताहर| Supa

करोना संसर्गाने संपूर्ण जग थांबले असताना शालेय विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान केले आहे. तर काही विद्यार्थ्यांच्या पुढील मार्गात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. काहींच्या पुढील स्वप्नांना ब्रेक लागला आहे .

भारतात जानेवारी 2020 ला करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला. मार्च 2020 च्या मध्यापर्यंत बारावीचे सर्व पेपर झाले परंतु दहावीचे पेपर चालू असतानाच महाराष्ट्रसह देशात करोनाने धुमाकूळ घातला सुरुवातीला जनता कर्फ्यू व नंतर नियमित लॉकडाऊन सुरू झाले. त्या गडबडीत इयत्ता दहावीच्या एका विषयाची परीक्षा राहिली. तेथूनच शालेय विद्यार्थ्यांच्या नुकसानीला सुरुवात झाली. म्हणजे 2020 ला दहावी, बारावी वगळता इतर कुठल्याही इयत्ताची परीक्षा झाली नाही. मुले एका वर्गातून दुसर्‍या वर्गात गेली. परंतु गुणवत्तेचे तीन-तेरा वाजले. तर 2020-21 या शैक्षणिक वर्षात मुले शाळेत गेली नाही. फोनच्या माध्यमातून जे काही मोडके तोडके शिकले. त्याच्या लेखा-जोखा मांडण्याची संधीही करोनाने विद्यार्थ्यांना दिली नाही. मार्च 2021 चे दहावीचे पेपर रद्दच झाले. तर बारावीच्या परीक्षेचा काही ताळमेळ नाही.

शालेय जिवनातील महत्त्वाचे टप्पे असलेले दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे करोनाने कधीही भरून न निघणारे मोठे नुकसान केले आहे. एप्रिल महिना संपत आला. कुठलेही प्रॅक्टीकल नाही. जीईची परीक्षाही अर्ध्याच झाल्या तर नीटच्या परीक्षा अनिश्चिततेच्या गर्तेत आहेत. तर सीईटीचीही तीच अवस्था आहे. जेथून विद्यार्थ्यांना आपल्या पुढील आयुष्याच्या मार्ग निवडायचा असतो अशा महत्त्वाच्याक्षणी करोनाने पुढील मार्गच बंद करून विद्यार्थ्यांपुढे अंध:कार पसरवला आहे. दहावीचे सर्वच विद्यार्थी पुढील वर्गात गेले.

परंतु जे विद्यार्थी प्रथम श्रेणीने पुढे जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा मोठा अडथळा आहे. हीच अवस्था चालू वर्षी बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची आहे. बहुतांशी विद्यार्थी येथूनच आपला व्यावसायिक मार्ग निवडतात .परंतु करोनामुळे परीक्षा नाही. त्यामुळे पुढले मार्ग खुंटले. शिकून डॉक्टर, इंजिनियरसह मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या काही विद्यार्थ्यांचे करोनामुळे स्वप्नभंग होते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. तर करोना काळात परीक्षा न देता पास होत पुढील वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांना पुढील काळात आपल्या प्रमाणपत्रावर करोना काळातील म्हणून शिक्का पडण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी काळात अडचण निर्माण करतील की काय असे वाटत आहे. एकंदरितच करोनाने विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com