करोनाग्रस्त पुत्रासाठी कामगार पित्याने दिले बलिदान

देवळाली प्रवरातील मन हेलावून टाकणारी घटना
करोनाग्रस्त पुत्रासाठी कामगार पित्याने दिले बलिदान

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

करोना महामारीच्या काळात रोज मन सुन्न करणार्‍या अनेक घटना घडत असतानाच पित्याने पुत्रासाठी स्वतःचे बलिदान केल्याचे मन हेलावून टाकणारी घटना देवळाली प्रवरा येथे घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

येथील एका कर्मचार्‍याच्या मुलाला करोनाची लागण झाली. एकुलता एक मुलगा, प्रपंच जेमतेम, दवाखान्याला लागणारा मोठा खर्च, पैसे आणायचे कोठून? मित्र परिवार व नातेवाईक मंडळींकडून कसे तरी उधार, उसनवारी करुन पैसे उपलब्ध केले आणि येथील खासगी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु या ठिकाणी प्रकृती आणखी बिघडल्याने रूग्ण हलविण्यास डॉक्टरांनी सांगितले. एका दिवसाचे साडे तेराहजार बील घेऊन रूग्णाला सोडण्यात आले.

विशेष म्हणजे हे कोविड सेंटर नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये सुरु असताना देखील त्या कर्मचार्‍याला काहीही सवलत देण्यात आली नाही. आणि इथून पुढे नशिबाचा दुर्दैवी प्रवास सुरु झाला. शासकीय रुग्णवाहिका मिळत नसल्याने खासगी रुग्णवाहिका मिळाली तर ऑक्सिजन बेड मिळेना. नंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात बेड मिळाला. या ठिकाणी पती-पत्नीने मुलाला नेल्याबरोबर दवाखान्याचे कंपौंडर त्याला घेण्यासाठी लगेच आले.

परंतु भाड्याचे पैसे मिळाल्याशिवाय रुग्णवाहिकेचा चालक रूग्णाला खाली घेऊ देईना. त्याने चौदा हजार रुपये भाडे मागितले. हो-ना करता करता मुलाच्या वडिलांनी दहा हजार रुपये भाडे त्याला देऊन मुलाला उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले. पत्नी तेथेच थांबली. पती घरी आला, पण त्याला त्रास होऊ लागल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी पुतण्याने त्यांना तपासणीसाठी दवाखान्यात नेले असता त्यांनाही करोनाची लागण झाली असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगून लवकर दवाखान्यात दाखल करण्यास सांगितले. पण रात्री उशीर झाला होता व वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरु असल्याने त्यांनी आपण उद्या दवाखान्यात दाखल होऊ, असे सांगून ते दोघे घरी आले.

दुसर्‍या दिवशी बारा वाजता घाटी येथून त्यांच्या पत्नीचा एका सामाजिक कार्यकर्त्याला फोन आला. त्यांनी सांगितले, त्यांचा फोन इथेच विसरुन राहीला आहे. त्यामुळे त्यांचा काही संपर्क होत नाही, तरी घरी जाऊन बघा. तो सामाजिक कार्यकर्ता घरी गेला असता घराजवळ भावकीतील माणस घरापासून काही अंतरावर जमा झालेली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी डॉक्टर व पोलिसांना फोन केला. त्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला असता ते घरात निपचित पडलेले होते.

डॉक्टरने तपासले असता त्यांचा प्राण कधीच गेला होता. एकीकडे मुलगा दवाखान्यात तर दुसरीकडे पतीचे निधन, त्या एकट्या माऊलीने काय करायचे? अशा प्रकारची मन हेलावून टाकणारी घटना देवळालीत पहिल्यांदाच घडली असल्याने देवळालकरांवर शोककळा पसरली आहे. परंतु नेहमी आपणच जनतेचे खरे कैवारी असणारे व कळवळा असणारे आहोत, असे दाखविणार्‍यांची मात्र, या कुटुंबाला आधार देण्याची दानत झाली नाही हे विशेष!

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com