करोनाचे संकट अन् प्रचंड उकाड्याच्या कात्रीत नागरिक हैराण

शेतीची कामे थंडावली; मानवी जीवनावरही परिणाम
करोनाचे संकट अन् प्रचंड उकाड्याच्या कात्रीत नागरिक हैराण

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

घरात बसावे तर प्रचंड उकाडा, बाहेर पडावे तर करोनाचे संकट यामुळे कात्रीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड उकाड्याने मोठे हाल होत आहेत.

एप्रिल महिना सुरु झाल्यापासून सूर्य सकाळीच आग ओकू लागला आहे. सकाळी साधारणपणे सात वाजल्यापासूनच तापमान वाढायला सुरुवात होत आहे. दुपारी बाराच्या पुढे तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर सरकत असल्याने हवेत प्रचंड उकाडा निर्माण होत आहे. याचा मानवी जिवनासह दुधाळ जनावरांवरही परिणाम झाला आहे. दुभती जनावरं कमालीची दुधाला कमी पडली आहे.

याचा शेती मशागतीवर देखील प्रतिकुल परिणाम झाला आहे. सध्या परिसरात कांदा काढणीचा व मागास गहू, हरभरा काढण्याचा हंगाम सुरु आहे. त्यामध्ये सध्या आभाळ फिरत असल्याने कांदा काढणीची व कांदा चाळून भुसारा भरण्याची झुंबड उडाली आहे. यावर देखील करोनाचे सावट बघायला मिळाले. करोनामुळे शेतात काम करणार्‍या मजुरांची संख्या घटली आहे. त्यामुळे कमी मजुरातच काम करावे लागत असल्याने कांदा काढणीला व भरणीला वेळ लागत आहे. त्यातच उन्हाचा पारा चाळीसी पार होत असल्याने मजुरांनी देखील कामाच्या वेळेमध्ये बदल केला आहे. सकाळी 7 ते 10 व दुपारी 4 ते 6 या वेळेतच मजूर कामावर येत असल्याने शेतीकामावर त्याचा परिणाम होत आहे.

त्यातच बाहेर मोठ्या प्रमाणात करोना फैलावत असल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने बाहेर सर्वकाही बंद आहे. त्यामुळे बाहेर पडणे अवघड आहे. घरात थांबावे तर नेहमीप्रमाणे वीज कमी दाबाने असल्याने हाताने फिरावे त्याप्रमाणे पंखे फिरत आहेत. करोनामुळे एसीमध्ये थांबणे धोक्याचे असल्याने घामाघूम अवस्थेत घरातच थांबावे लागत आहे. यातून मात्र काहींनी मार्ग काढला असून झाडाखाली जाऊन थंडगार सावलीला बसणे पसंत केले आहे. झाडाखाली बसल्याने ऑक्सिजनची पातळी वाढत असल्याने अनेक जण शेतातील झाडाखाली व घरासमोरील झाडांचा आसरा घेत असताना दिसत आहेत. कधी एकदाचे या करोनाचे वाटोळे होतं आणि आम्हाला मोकळा श्वास घेता येईल, असे झाले असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगताहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com