पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा गावात मातीपासून विविध हस्तकलेच्या वस्तू बनविणारा मोठा कारागीर वर्ग आहे. परंतु करोनाच्या सावटाखाली

यावर्षीची दिवाळी असल्यामुळे अनेक ग्रामीण हस्तकला कारागिरांना याचा आर्थिक फटका बसला, असे हस्तकला कारागीर भगवान जगदाळे यांनी आपली खंत दै. सार्वमतशी बोलताना व्यक्त केली.

परिसरात मोठी बाजारपेठ म्हणून लैकिक असलेले पुणतांबा गाव होते. काळाच्या ओघात व्यवसायाला चालना मिळेल असे कोणतेच राजकीय प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे मोठी बाजारपेठ म्हणून असलेली ओळख काळाच्या पडद्याआड गेली परंतु स्थानिक कारागीर, छोटे व्यावसायिक उपजिवीका करण्यासाठी जमेल तसा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करित असतात.

येथे मातीच्या हस्तकलेच्या माध्यमातून दर दिवाळीला पणत्या, लक्ष्मी व इतर वस्तूंची निर्मिती करत असतात. परंतु यावर्षी जगात करोनाचे मोठे संकट असल्याने अनेक मालाची, वस्तूंची निर्मिती करण्यावर व सहज उपलब्ध होणार्या मालावर मोठी मर्यादा आली. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिस या मातीचे मार्केट भाव वाढले.

यापासून लक्ष्मीची निर्मिती करण्यात येते. मातीचे भाव वाढूनही वेळेवर उपलब्ध न झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला. जो माल उत्पादीत झाला त्याचे दर वाढले आणि त्यामुळे खरेदी-विक्रीवर परिणाम झाला. बाजारपेठेत गर्दी दिसली परंतु पाहिजे त्या प्रमाणात खरेदी विक्री झाली नाही. मूळ भांडवल वसूल व्हावे म्हणून विक्री किमती कमी केल्या तरी लोकांचा खरेदीकडे कल नव्हता.

यावर्षी लोकांनी कमी खर्चात दिवाळी साजरी केली. त्यामुळे अनेक कारागीरांना आर्थिक फटका बसला आहे. शिवाय ग्रामीण भागात शेण व पांढरी माती यासारख्या मिश्रणातून विविध वस्तू येथील हस्त कारागीर बनवित होते. परंतु पणती देखील बनविणारी यंत्रणा विदेशी बनावटीची झाल्याने ग्रामीण भागात मातीपासून बनविलेल्या हस्तकला वस्तू घेण्यास ग्राहकांचा कल राहिला नाही. त्यामुळे देखील ग्रामीण भागातील हस्त कारागीरांना यावर्षी मोठा आर्थिक फटका बसल्याचे भगवान जगदाळे यांनी सांगितले.