‘करोना’ चे संकट आणखी 8 महिने

निमगाव वाघामध्ये होईक : यंदा शेतीला व लक्ष्मीला पिडा नसल्याची भविष्यवाणी
‘करोना’ चे संकट आणखी 8 महिने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील वर्षी सांगितलेले रोगराईचे भाकीत खरे ठरले. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील बिरोबाचे देवाचे

भगत नामदेव भुसारे यांनी होईक (भविष्यवाणी) सांगताना पुढील वर्षी येणार्‍या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. करोना महामारीचे संकट अजून आठ महिने राहणार असून, देशात मोठ्या चळवळीसह युध्दाची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली असली तरी यंदा शेतीला व लक्ष्मीला पिडा नसल्याची भविष्यवाणी यावेळी वर्तविण्यात आली. बिरोबाच्या मंदिरातील हे होईक ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

निमगावमध्ये यावर्षी देखील पशुहत्या बंदीचे पालन करून देवाला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. देवाचे भगत भुसारे यांनी होईक वर्तविताना सांगितले की, यंदा रक्ताचा पूर वाहणार म्हणजे युध्द होणार. बाया न्हात्यान, धुत्यान व पालखीत मिरत्याल. लक्ष्मीला पिडा नसून, बाळाला संकट आहे. चित्ता सवातीचा पाच ते अडीच दिवस आभाळ फिरेल व ज्वारीच्या पिकाला अपकार होईल. दिवाळीच दिपान पाच ते सात दिवस आभाळ येऊन काही ठिकाणी पाऊस पडेल.

सटीच सटवान पाच ते सात दिवस फिरून कर्मभागी पाऊस होणार आहे. गायी देठाला लागून, नव तूप होणार. दिनमान (ग्रहण) काळा होईल. कपाशीला 7 ते 9 हजार क्विंटल, सोन्याला 40 ते 54 हजार रुपये तोळा, ज्वारी 2 हजार 500 ते 2 हजार 700 रुपये पर्यंतचा पुढील वर्षासाठी भाव वर्तवला. तसेच गहू, हरभर्‍यावर तांबारा रोग पडेल व गहू, हरभराचे मनभाव राहणार असल्याचे सांगितले. तर कल्याण कुर्तिका सात ते अकरा दिवस आभाळ फिरुन पाऊस होईल.

पुढील आषाढी कठिण जाईल व मुगराळ्याची पेर होऊन घडमोड होईल. ज्वारी, गहू व हरभार्‍यांची पेर होऊन काही हसतेन काही रडतेन, असे भाकीत होईकात सांगण्यात आले आहे.

भुसारे यांनी मागील वर्षी युध्द, नैसर्गिक संकट व रोगराईचे सांगितलेले भाकित यावर्षी खरे ठरले. यावर्षी पाकिस्तान, चीनशी युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी महापूर, चक्रीवादळ आले. तर करोना सारख्या महामारीशी सामना करावा लागत आहे. भविष्यवाणी ऐकण्यासाठी नगरशहरासह परिसरातून भाविक मोठ्या संख्याने आले होते. यावेळी सामाजिक आंतर पाळण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com