करोना संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांकरिता आढावा बैठक

करोना संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांकरिता आढावा बैठक

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

करोना व्हायरसच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाय-योजनांकरिता नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली.

बुधवार दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, कोपरगाव तहसीलदार विजय बोरूडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, श्री साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. सुनीता कडू आदी उपस्थित होते.

श्री. गमे यावेळी म्हणाले, करोनाच्या ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर संस्थान व जिल्हा प्रशासनाने समन्वयाने कामकाज केले पाहिजे. संभाव्य लाटेसाठी सज्ज राहिले पाहिजे. यासाठी संस्थानने ‘जीनोम सीक्वेसिंग लॅब’ उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून याचा लाभ विविध आजारांवरील व्हेरिएंट तात्काळ शोधण्यास मदत होईल. तसेच संस्थानने त्यांच्या रुग्णालयातील सध्याच्या ऑक्सीजन बेड्सच्या संख्येत वाढ केली पाहिजे. यासाठी दानशूर संस्थांना मदतीचे आवाहन करावे, असे सांगून प्रत्येक दिवशी 5 हजार लोकांची आरटीपीसीआर टेस्ट करता येतील असे नियोजन करण्यात यावे. लिक्वीड मेडिकल ऑक्सिजनसाठी प्लाँट कार्यान्वीत करण्यात यावा. वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय सामुग्री, ड्यूरा सिलेंडर आदी बाबींचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी दिल्या.

याप्रसंगी संस्थानच्यावतीने करोना काळात केलेल्या व सद्य स्थितीत उपलब्ध असलेल्या उपाययोजनांची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com