लोणी बुद्रुकमध्ये आणखी एक करोनाबाधित
सार्वमत

लोणी बुद्रुकमध्ये आणखी एक करोनाबाधित

चंद्रापूरमधील दोघा संशयितांचे स्राव घेतले

Arvind Arkhade

लोणी|वार्ताहर|Loni

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील आणखी एका व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याने रुग्णांची संख्या पाच झाली. दरम्यान 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 7 जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. लोणी जवळच्या चंद्रापूर येथील दोघांना लक्षणे आढळून आल्याने सोमवारी त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेण्यात आले.

लोणी बुद्रुक येथील व्यापारी व त्यांच्या कुटुंबातील दोघांना करोनाची बाधा झाल्यानंतर पनवेल येथून आलेल्या गावातील एका व्यक्तीच्या पाहुण्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. या दोन्ही व्यक्तींच्या संपर्कातील 32 व्यक्तींचे स्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील एक व्यक्ती बाधित आढळून आल्याने त्यांना प्रवरा कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींचे स्राव तपासणीसाठी घेण्यात आले.

पनवेल येथून आलेल्या व्यक्तीची पत्नी आणि मुलगा यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला. ज्या व्यक्तीकडे ते आले होते. त्यांच्या कुटुंबातील एकाचा अहवाल निगेटिव्ह आला असून तिघांचा अहवाल अजून यायचा आहे.

राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी काल बाधित निघालेल्या व्यक्तीच्या निवास परिसराला प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले. लोणी बुद्रुक येथे सध्या चार प्रतिबंधात्मक क्षेत्र असून उर्वरित गावातील व्यवहार मात्र सुरू ठेवण्यात आले आहेत.

लोणी बुद्रुक गावालगत असलेल्या चंद्रापूर गावातील दोघे जण नातेवाईकाच्या दशक्रियाविधीसाठी कन्नड येथे गेले होते. तेथे त्यांनी चार दिवस मुक्काम करून पुन्हा चंद्रापूरला परतले. मात्र काल त्यांनी सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेऊन त्यांना शिर्डी येथे विलागीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. लोणीतील सात आणि चंद्रापूर येथील दोन व्यक्तींच्या अहवालाकडे दोन्ही गावांतील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Deshdoot
www.deshdoot.com