करोना पॉझिटिव्ह संपर्कातील 48 तासांत शोधा

उपाध्यक्ष शेळके : आरोग्य आढावा बैठकीत वैद्यकीय अधिकार्‍यांना सूचना
करोना पॉझिटिव्ह संपर्कातील 48 तासांत शोधा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेली व्यक्ती

किंवा नातेवाईक यांची 48 तासांच्या आत तपासणी करून घ्यावी, अशा सूचना जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी दिल्या.

शेळके यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी आरोग्य समितीची आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. यावेळी जिल्ह्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त तपासण्या होणे गरजेचे आहे.

त्या अनुषंगाने तालुकास्तरीय तसेच खेडेगावातही आरोग्य यंत्रणेने पोहोचणे गरजेचे आहे. करोनाबाधित व्यक्तीच्या नातेवाईकांची व सहवासीतांची तत्काळ 48 तासांत तपासणी करून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत, त्यासाठी तालुकास्तरीय वैद्यकीय अधिकार्‍यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना उपाध्यक्ष शेळके यांनी दिल्या. याशिवाय करोनाबधिताच्या संपर्कामध्ये आलेल्या सर्व नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, हात वारंवार धुणे अशी काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे साथीच्या आजारांबरोबरच मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनिया अशा किटकजन्य आजारांच्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकार्‍यांना त्यांनी सूचना दिल्या.

नियमित लसीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग दुरीकरण व राष्ट्रीय सुधारित क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला.या बैठकीत सदस्य सिताराम राऊत, पंचशीला गिरमकर, कविता लहारे, सविता अडसुरे, पुष्पा वराळ, रामभाऊ साळवे, सोमनाथ पाचारणे, नंदा गाडे यांनी सहभाग घेतला.

सभेचे कामकाज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी पाहिले. सभेस कुष्ठरोग संचालक डॉ. शरद काळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुनील पोटे, वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

’माझे कुटुंब माझी जबाबदारी’

’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार कुटुंबांचे सर्वेक्षण करून लक्षणे असणारे रुग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यात 1 हजार 755 टीम कार्यरत असणार आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत सर्वेक्षणादरम्यान मोबाईलवर उपलब्ध माहिती भरण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com