करोनामुळे पेरू बागांचे अस्तित्व धोक्यात
सार्वमत

करोनामुळे पेरू बागांचे अस्तित्व धोक्यात

मजुरीही सुटत नाही, उत्पादन खर्चाच काय ?

Arvind Arkhade

राहाता - करोनाच्या संकटामुळे राज्य व बाहेरील राज्यात पेरूला भावच नसल्यामुळे पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून खर्च वजा जाता 20 किलोची शिल्लक अवघी 50 रूपये येत असल्याने पेरु उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

गेली पाच वर्ष पडलेला सततच्या दुष्काळामुळे पेरू उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकर पेरू बागा तोडाव्या लागल्या. मात्र गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. भर उन्हाळ्यातही धरणे भरलेली होती. वेळेवर पाऊसही पडल्याने राहाता तालुक्यातील हजारो एकर पेरू बागा व पेरू उत्पादक शेतकरी समाधानी होते.

यावर्षी तरी चार पैसे हमखास मिळतील ही आशा बाळगून होते. भर उन्हाळ्यात बागांची मशागत केली. हजारो रूपये या बागांवर खर्च केले. जुलै महिन्यात बागा सुरूही झाल्या मात्र राज्यातील व बाहेरच्या राज्यात बाजारपेठांमध्ये करोना व लॉकडाऊन याचा फटका पेरू बागांनाही बसला असून शहरात विक्री करता येत नसल्याने मागणी नाही त्यामुळे पेरू फळाचे बाजार पडल्याने उत्पादन खर्च सोडा तोडणी व वाहतूक खर्चही सुटत नाही.

तालुक्यात पेरूचे मोठे आगार आहे. या पेरूला मुंबईसह गुजरात, मध्यप्रदेशमध्ये मोठी मागणी असते. जुलैमध्ये या पेरू बागांचा सिजन सुरू होतो. चार ते पाच महिने तो चालतो. बाहेरच्या राज्यातील व्यापारी बांधावर माल खरेदी करून पाठवतात. या दिवसात सरासरी 300 ते 400 रूपये दर 20 किलोला मिळत असे.

मात्र यावर्षी करोना संकटामुळे कोठेही मागणी नसल्याने तसेच मुंबई व गुजरात आदी ठिकाणी बाजारपेठा बंद असल्याने पेरूला मागणी नाही. गुजरात येथे पाठविलेला पेरूची अवघी 50 ते 100 रूपये शिल्लक येते. त्यात तोडणी व वाहतूक खर्चही निघत नसल्याने तयार माल बागेतच पडून सडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

या पेरू बागांमुळे हजारो लोकांच्या हाताला काम मिळते. मजूर, बागवान, मालवाहतूक करणारी वाहने, त्यावरील चालक व मजू,र व्यापारी व किरकोळ विक्रेते अशी ही साखळी असून विक्री करता येत नसल्याने मालाला मागणी नाही त्यामुळे ही वेळ आली. अगोदरच लॉकडाऊनमुळे शेतकरी व नागरिक हतबल झाले. रोजगार नाही हातात पैसा नाही व हाताला काम नसल्याने करावे तरी काय या चिंतेने ग्रासले आहे. त्यात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतीला बसत असून रब्बी वाया गेला आता खरीपाचीही दुर्दशा झाली. यामुळे करावे तर काय ही चिंता भेडसावत आहे.

पेरू, डाळींब उत्पादक शेतकर्‍यांंना हवामान अधारीत पिक विम्याचा मोठा आधार होता. मात्र यावर्षी विमा कंपन्या व सरकारने निकष बदलल्याने त्याचा फायदा कोणत्याच पिकाला होणार नाही. तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी पीक विमा भरूनही त्या लाभापासून वंचित राहिले. करोनाच्या वाढत्या व्याप्तीमुळे यावर्षी तरी पेरू पिकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

तयार पिवळ्या पेरू फळावर प्रक्रिया करून विविध उत्पादने करून देश विदेशात पाठविणार्‍या मोठ्या कंपन्या राज्यात व गुजरातमध्ये आहेत. उत्पादीत पेरूच्या 50 टक्के पेरू या कंपन्या उचलतात. मात्र गेल्या वर्षी तयार झालेला माल लॉकडाऊनमुळे विकला न गेल्याने व मोठा भांडवली खर्च लागत असल्याने नविन पेरू खरेदी करून त्याची प्रोसोसींग करायला कंपनी मालक धजत नसल्याने पिवळा पेरूला मागणी नसल्याने बागेतच तो सडत असून यावर्षी चांगले पीक येऊनही शेतकर्‍याच्या हातात काही पडेल अशी आशा वाटत नाही.

Deshdoot
www.deshdoot.com