अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोना संसर्ग वाढीचे भय असताना दरवर्षीप्रमाणे दिवाळीनंतर यंदा देखील रोजगार हमी योजनेवर 7 हजार 200 मजुरांची उपस्थिती आहे.

या मजुरांमार्फत जिल्ह्यात रोहयोची 1 हजार 631 कामे सुरू आहेत. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जादा पाऊस होऊन मजुरांनी शेतीसोबत रोहयोच्या कामाला पसंती दिली असल्याचे रोहयोच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि महसूल विभागाच्या यंत्रणे मार्फत स्वतंत्रपणे रोजगार हमी योजना राबविण्यात येते. 1972 च्या दुष्काळात राज्यात सर्वाधिक मजुरांच्या हाताला काम नगर जिल्ह्याला मिळाले होते.

त्याकाळात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झालेली असून आजही त्यांची स्थिती चांगली आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षांत सरकारने रोजगार हमीवरील कामांची व्याप्ती वाढली आहे. यात विहिरी, घरकुले, शोष खड्डे, जनावरांचा गोठा, शेळी निवारा, विहीर पुनर्भरण, गट लागवड यांचा समावेश आहे. पूर्वी जलसंधारणाची कामे, तलावातील गाळ काढणे, जलसंधारणाची कामे आणि रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड यांची कामे रोहयोतून करण्यात येत होती.

उन्हाळ्या करोना लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात शहरातील मजूर गावाकडे स्थालांतर झाले. यामुळे राज्य सरकारने या मजूरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमीचा पुरवणी आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, शहरातील हे मजूर रोहयोच्या कामाकडे वळाले नसल्याचा अंदाज रोहयो विभागाला आहे. जिल्ह्यात सध्या रोहयोच्या कामावर 7 हजार 200 मजूर असून यात जिल्हा परिषद ग्रामपंचायतीकडील 2 हजार 345 मजूरांची संख्या असून कामांची संख्या 825 आहे. तर यंत्रणेकडे 4 हजार 806 मजूर असून त्यांच्या कामांची संख्या 806 आहे.

तालुकानिहाय मजूर आणि कामे

अकोले 469 (198), जामखेड 1 हजार 209 (261), कर्जत 769 (102), कोपरगाव 185 (55), नगर 445 (99), नेवासा 654 (137), पारनेर 827 (107), पाथर्डी 367 (70) राहाता 296 (102), राहुरी 204 (67), पारनेर 548 (107), शेवगाव 462 (70), श्रीगोंदा 512 (202), श्रीरामपूर 214 (31) एकूण 7 हजार 200 (1 हजार 631).