अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संकटाचे चित्र आणखी गडद होत असताना जिल्हा प्रशासनाने नगर शहरात रात्री आठनंतर संचार बंदी लागू केली आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व सेवा, हॉटेल, दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची शहरात अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, नगर शहराच्या चारही दिशेला असणार्या महामार्गावर वेगळेच चित्र आहे. याठिकाणी हॉटेल धाबे रात्री उशीरापर्यंत सुरू असून त्याठिकाणी तोबा गर्दी असल्याचे पहावायास मिळत आहे.

नगर शहरात आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत करोना संसर्गाचा उद्रेक पाहण्यास मिळत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने येणार्या बाधितांच्या रिपोर्टमुळे आरोग्य खाते आणि जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले स्वत: ग्रामीण भागात उद्रेक होणार्या तालुक्याला भेटी देऊन कोव्हिड परिस्थितीचा आढावा घेऊन त्या ठिकाणी उपाययोजना राबवित आहेत.

नगर शहरात देखील पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार अंमलबजावणी सुरू केली आहे. रात्री आठनंतर हॉटेल, दुकाने सुरू राहणार नाहीत, याची खात्री करत असून ज्याठिकाणी नियमांचे पालन होत नाहीत, अशा ठिकाणी थेट कारवाई करताना दिसत आहे.

मात्र, महामार्ग आणि ग्रामीण भागात अद्याप परिस्थितीचे गांभिर्य नसल्याचे चित्र आहे. रात्री उशीरापर्यंत सर्व काही खुले असून त्यामुळे ग्रामीण भागात झपाट्याने करोना वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे प्रशासनाने केवळ शहरी भागात लक्ष न देता ग्रामीण भागात रात्रीच्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

खास हॉटेलमध्ये जेवणावळ्या

जिल्ह्यात ग्रामीण भागात आणि महामार्गावर काही निवडक हॉटेल हे जेवणाळींसाठी प्रसिध्द आहे. याठिकाणी दिवसभर ग्राहकांची गर्दी असतेच. करोना निर्बंध असतानाही त्याठिकाणी रात्री उशीरापर्यंत जेवणावळ्या सुरू असतात. काही हॉटेलच्या पुढील बाजूच्या लाईटस् बंद असतात आणि पाठीमागे दणक्यात सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.