करोना काळातही जिल्हा बँकेने राखली शेतकर्‍यांची पत

खरीप हंगामासाठी सर्वाधिक वाटले 830 कोटींचे कर्ज || सरकारी, खासगी, ग्रामीण बँका मात्र पीक कर्जासाठी उदासीन
करोना काळातही जिल्हा बँकेने राखली शेतकर्‍यांची पत

अहमदनगर| Ahmednagar| ज्ञानेश दुधाडे

सलग दुसर्‍या वर्षी करोना लॉकडाऊनचा फटका जिल्ह्यातील अर्थ चक्राला बसताना दिसत आहे. शहरासह ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला काम नाही. कांदा, ऊस, या नगदी पिकांसोबत खेळता पैसा म्हणून ओळख असणार्‍या दूध धंद्याची स्थिती विचित्र झालेली आहे.

अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना येणार्‍या हंगामासाठी पैशाची चणचण असताना नेहमीप्रमाणे जिल्हा सहकारी बँक शेतकर्‍यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेली दिसत आहे. करोना काळातही जिल्हा बँकेने जिल्ह्यातील शेतकर्‍यांची पत राखली असून यामुळे खरीप हंगामासाठी बँकेने 830 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर येत्या महिनाभरात हा आकडा एक हजार कोटींच्या टप्प्यात पोहचणार आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. हंगामासाठी खते, बियाणे, किटकनाशकांसोबत शेतकर्‍यांना खेळत्या भांडवलाची गरज असते. जगात सर्वाचे सोंग आणता येते, पण पैशाचे नाही, या म्हणीचा अनुभव सर्वजण करोना महामारीमुळे घेत आहे. करेानामुळे शहरी भागासह ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा वेग मंदावला नव्हे, तर हे अर्थकारण थांबलेले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना भांडवलासाठी कोण दारात उभे करत नसतांना दरवर्षी प्रमाणे यंदही करोना संकटाचा बाऊ न करता, उलट करोनातही शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात खरीप पिकासाठी कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 3 हजार 753 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. यात जिल्हा बँक, सरकारी बँक, खासगी बँका आणि ग्रामीण बँकांना कर्जाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. मात्र, जिल्हा बँक वगळता अन्य बँका शेतकर्‍यांच्या कर्जाबाबत फारशा गंभीर नसल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. ते करोना काळात कायम असल्याचे जिल्हा अग्रणीय बँकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 898 कोटी रुपयांचे कर्जाचे वाटप झालेले असून यात एकट्या जिल्हा बँकेचा वाटा 830 कोटी आहे. तर सरकारी बँकांनी 46 कोटी 62 लाख, खासगी बँकांनी 20 कोटी 95 लाख तर ग्रामीण बँकेने अवघा 1 कोटी 7 लाखांचे अर्थसहाय शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिलेले आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यात करोना संकटातही शेतकर्‍यांच्या मागे भक्कमपणे जिल्हा सहकारी बँक उभी असल्याचे दिसत आहे.

बागायत तालुक्यात कमी कर्ज

खरीप हंगामाच्या कर्ज वाटपचा कालावधी हा सप्टेंबर महिन्यांपर्यंत असतो. साधारण एप्रिल, मे पासून खरीपासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरूवात होते. मात्र, बागायत तालुक्यात प्रामुख्याने ऊस लागवडीसाठी कर्ज घेण्यात येते. ही लागवड उशीरा सुरू होत असल्याने सध्या ज्या तालुक्यात ऊसाचे क्षेत्र अधिक आहे, त्या ठिकाणी जिल्हा बँकेचे कर्ज सध्या कमी दिसत आहे. मात्र, पावसाच्या पाण्यावर पिके घेणार्‍या तालुक्यात सध्या जिल्हा बँकेच्या पतपुरवठ्याचा आकडा अधिक असल्याचे दिसत आहे.

शेतकर्‍यांना मदत करण्याचे कामच जिल्हा बँकेचे आहे. करोना काळ असो किंवा इतर कोणतीही अडचण असो शेतकर्‍यांना मदत करण्यास जिल्हा बँक आघाडीवर असते. यामुळेच शेतकर्‍यांच्या हितासाठी जास्तीजास्त पत पुरवठा करण्याचा जिल्हा बँकेचा प्रयत्न असून भविष्यातही राहणार आहे. जिल्हा सरकारी बँक ही शेतकर्‍यांची बँक आहे. शेतकर्‍यांना शेतीसाठी पत पुरवठा करणे हे जिल्हा बँकेचा मुख्य उद्देश असून आतापर्यंत शासनाच्या सर्व योजना जिल्हा बँकेने प्रभावीपणे राबविलेल्या आहेत.

- भानुदास मुरकुटे, ज्येष्ठ संचालक, जिल्हा बँक.

तालुकानिहाय पतपुरवठा (आकडे कोटींमध्ये)

अकोले 94.50, संगमनेर 106.40, श्रीरामपूर 10, नगर 126.21, जामखेड 55.49, कर्जत 70.26, कोपरगाव 9, नेवासा 17.10, शेवगाव 24.30, श्रीगोंदा 19.73, पारनेर 163.61, पाथर्डी 98.35, राहुरी 22.40, राहाता 11.75.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com