करोना रुग्णांची लूटमार थांबवा

करोना रुग्णांची लूटमार थांबवा

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

सध्या संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर करोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असून त्याचा परिणाम म्हणून वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची लूटमार होत असल्याची तक्रार येऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर येथील रुग्णांची संख्या सातत्याने तीनशे ते चारशेच्या दरम्यान राहत आहे.

त्यात संगमनेर, अकोले, सिन्नर, आळेफाटा, कोपरगाव, राहाता तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे संगमनेर येथील सर्व हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने भरलेले दिसत आहेत. एक रुग्ण सुटण्याचा उशिर तोच एका खाटेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण प्रतिक्षेत आहेत. रुग्णांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत असून या प्रतिक्षेत वाढत जाणार्‍या संख्येमुळे एका खाटेसाठी अधिक रक्कम मोजावी लागत असल्याचे सांगण्यात आले.

रेमडेसिवीरचा काळाबाजार-

संगमनेर शहरात कोव्हिड संदर्भातील औषधांचा काळाबाजार होताना दिसत असून, गोरगरीब रुग्णाच्या नातेवाईकांची प्रचंड आर्थिक लूट काही लोक करत आहेत. करोनावरती अधिक प्रभावी ठरलेल्या रेमिडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत हा प्रकार खाजगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावर पर्याय म्हणजे जे इंजेक्शन रुग्णांना दिले जाणार आहे ते नातेवाईकांसमोर देण्यात यावे. त्या इंजेक्शन वरती नातेवाईकांची स्वाक्षरी घेण्यात यावी. रिकामे झालेली इंजेक्शनची बाटली नातेवाईकांना परत देण्यात यावी. आज एक इंजेक्शन किती तरी वेळा विकले जात आहे. त्याचे हजारो रुपये दलाल कमावून चांगले काम करणाराची बदनामी करत आहेत. त्यामुळे केलेल्या सूचना अंमलात आणल्या तर नक्की दलालांना आवर घालता येऊन काळाबाजार बंद होईल. याबाबत स्थानिक प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करण्याची गरज असल्याचे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे यांनी म्हटले आहे.

रुग्णवाहिकेच्या दरातही लूटमार-

करोनाच्या कालावधीत रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, रुग्ण बरे झाल्यानंतर घरी पोहचविणे अशा सुविधेसाठी देखील चालकांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम वसूल होत असल्याचे सांगण्यात येते. शासनाने रुग्णवाहिकेच्या दर पत्रका संदर्भात यापूर्वी भूमिका घेतली होती. मात्र त्या दराप्रमाणे नागरिकांना सुविधा मिळते किंवा नाही याची पडताळणी करणारी कोणतीही व्यवस्था सध्या कार्यरत नसल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबतीतही भूमिका घेण्याची गरज आहे. सध्या जीव वाचविण्यासाठी नागरिक हवे तितके पैसे मोजण्यास तयार आहेत. ही मानसिकता ओळखून रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लुटमार होत असल्याचे समोर आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com