करोना रुग्णांची हेळसांड
सार्वमत

करोना रुग्णांची हेळसांड

श्रीगोंद्याच्या काँगेस कार्यकर्त्यांनी केली तक्रार

Arvind Arkhade

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

शहरातील कोविड-19 या विभागातील करोना संशयित रुग्णाना क्वारंटाईन केल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा नसून दिले जाणारे जेवण देखील अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने या बाबत लवकरात लवकर दखल घेऊन रुग्णांना न्याय द्यावा अन्यथा अहमदनगर युवक काँग्रेस या वतीने वसतिगृहाच्या दारात आंदोलन करण्यात येणार असल्याचे युवक काँग्रेसचे स्मितल वाबळे यांनी शुक्रवारी सांगितले.

श्रीगोंदा शहरात समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहमध्ये चालू केलेल्या कोविड-19 या विभागात करोना संशयित व्यक्तींचे तपासणीसाठी लागणारे घटक घेतले जातात आणि रिपोर्ट येईपर्यंत त्या व्यक्तींना तिथेच वसतिगृहामध्ये ठेवले जाते. परंतु त्या ठिकाणी असलेल्या रुग्णांना मिळणारे जेवण अतिशय निकृष्ट असल्याचे तेथील रुग्णांनी सांगितले.

अतिशय निकृष्ट असलेल्या जेवणात चपात्या अर्धवट भाजलेल्या, पातळ भाजी, सकाळचे जे दिले तेच जेवण संध्याकाळी दिले जात असल्याची माहिती मिळाली. तसेच त्या व्यक्तींना झोपण्यासाठीही निव्वळ कॉट सोडली तर काहीही साधन सामग्री मिळत नाही.

परिसरात स्वच्छता नसल्याने या ठिकाणी डासांचे साम्राज्य पसरले असून. या बाबत लवकरात लवकर दखल घेऊन रुग्णांना न्याय द्यावा अन्यथा अहमदनगर युवक काँग्रेस मार्फत वसतिगृहाच्या दारात आंदोलन करण्यात येईल असे युवक काँग्रेसचे स्मितल वाबळे यांनी सांगितले.

जेवणाबाबतीत ज्यांनी कुणी तक्रार केली आहे ती चुकीची आहे. जेवण चांगले आहे, मी पण एकदा जेवण केले आहे. तसेच आमचे कर्मचारीसुद्धा जेवण करतात. तसेच स्वच्छतेबाबतही रोज नगरपालिकेचे कर्मचारी येऊन स्वच्छता करतात. त्याच प्रमाणे रोज काढाही दिला जातो; परंतु एक जणाला पुणे येथे जायचे होते. आम्ही त्यास प्रतिबंध केला म्हणून कदाचित त्याने चुकीची तक्रार केली असावी, अशी प्रतिक्रिया तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com