करोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना आधार देणारा लातूर पॅटर्न

ओमप्रकाश पडिलेंनी केली दहा हजार लोकांची निवास, भोजन आणि नाष्ट्याची मोफत सोय
करोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना आधार देणारा लातूर पॅटर्न

लोणी | Loni | दादासाहेब म्हस्के

कुटुंबात पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्ती आणि दान करण्याची परंपरा.. वारकरी संप्रदायाशी जोडल्याने गळ्यात तुळशीच्या माळा.. लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शेतीत तीन भव्य मंगल कार्यालये.. करोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यातून लातूर शहरात दररोज येणारे शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांची होणारी गैरसोय पडिले कुटुंबाला अस्वस्थ करीत होती. महामारीत सर्वसामान्यांना आधार द्यायचा त्यांनी निश्चय केला आणि लातूर शहरात आलेल्या प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकाच्या निवास, भोजन आणि नाष्ट्याची मोफत सोय करण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला. स्वतःची तीन मंगलकार्यालये त्यासाठी सर्व सोयी सुविधांनी सज्ज केली. दररोज दहा हजार लोक राहू शकतील एवढी व्यवस्था निर्माण केलेला हा नवा लातूर पॅटर्न अवघ्या महाराष्ट्राला आता नवी दिशा देणारा ठरला आहे.

आज जे लातूर शहर उभे आहे त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पन्नास एकर जमीन ज्यांची होती आणि आजही आहे ते मराठवाड्यातील सर्वदूर परिचित नाव म्हणजे शामराव दिवाणजी. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे राजकीय गुरु म्हणून त्याना ओळखले जाते. मात्र ते सध्या हयात नसले तरी त्यांचे संस्कार पुढच्या पिढीच्या कृतीतून दिसत आहेत. त्यांना दोन मुले. दोघांची शहरात तीन-तीन मंगलकार्यालये. त्यातील ओमप्रकाश शामराव पडिले यांनी पंधरा एकर शेतीत तीन मंगलकार्यालये बांधलेली आहेत.

सर्व सोयी-सुविधासह भरपूर झाडी, फुले, हिरवळ असे निसर्गरम्य वातावरण. विवाह समारंभाला दहा हजार लोक बसू शकतील एवढी प्रत्येकाची क्षमता. लातूर शहरात मोठी रुग्णालये असल्याने जिल्ह्यातून शेकडो करोना बाधित रुग्ण शहरात येत आहेत. रुग्णांना बेड मिळतोय पण त्याच्या सोबत आलेल्या नातेवाईकाला ना राहण्याची, ना जेवणाची सोय. लॉकडाऊनमुळे हॉटेल, लॉज सर्वकाही बंद. मिळेल त्या ठिकाणी मोकळ्या जागेवर राहण्याची वेळ नातेवाईकावर आल्याचे पाहून ओमप्रकाश अस्वस्थ झाले. वारकरी विचारधारा आणि पिढ्यानपिढ्याची परोपकाराची परंपरा त्यांना शांत बसू देत नव्हती. अखेर त्यांनी कुटुंबासोबत विचारविनिमय करून धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी मनुष्यबळ आणि लाखो रुपये कदाचित कोटी सुद्धा लागणार होते पण या कुटुंबाने निर्णय केला आणि लातूर शहरात दहा हजार लोकांची विनामूल्य सोय केली.

तिन्ही मंगल कार्यालयात निवासाची सुविधा निर्माण करण्यात आली. सकाळचा नाष्टा, दोन वेळचा चहा, दोन वेळचे जेवण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी आदी सर्व सोयी विनामूल्य उपलब्ध करण्यात आल्या. लोकांना आधाराची गरज होतीच. माहिती मिळताच गरजूंचे पाय दिवाणजी, शाम आणि ओम मंगलकार्यालयाकडे वळू लागली. ओमप्रकाश यांचे सुपुत्र अक्षय व आशिष यांनी यासाठीच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत चार दिवसापूर्वी ही सेवा सुरू केली आहे.

सध्या शेकडो गरजू त्याचा लाभ घेत असून भविष्यात दहा हजार लोकांची सोय करायची वेळ आली तरी करण्याची तयारी ठेवली आहे. लातूरमध्ये आलेल्या प्रत्येक गरजूला पुढील दोन महिने आम्ही ही मोफत सेवा देणार असल्याचे पडिले कुटुंबीय सांगतात. श्रीमंत अनेक आहेत पण गरजूंना संकटाच्या काळात मदत करायची सुद्धा दानत लागते आणि त्यांनाच दानशूर म्हटले तर शोभून दिसते. महाराष्ट्राने शिक्षणातील लातूर पॅटर्न यापूर्वी बघितला आहे. करोना महामारीतही लातूरने महाराष्ट्राला सामाजिक बांधिलकीचा, परोपकाराचा नवा पॅटर्न दिला असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्याचे अनुकरण होईल ही अपेक्षा आहे.

पडिले कुटुंबाची दानशूर म्हणूनच ओळख- एलम

लातूरचा हा नवा पॅटर्न निर्माण करणारे ओमप्रकाश पडिले यांचे राहाता तालुक्यातील येलमवाडी येथे प्रकाश शंकरराव एलम हे मेहुणे आहेत. त्यांनी पडिले कुटुंबाविषयी माहिती देताना सांगितले की, हे कुटुंब दानशूर म्हणून लातूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यांच्या घरी आलेला प्रत्येक व्यक्ती जेवण घेतल्याशिवाय माघारी जात नाही अशी अनेक पिढ्यांपासून परंपरा आहे. आजही कामानिमित्त येणारे वीस-पंचवीस लोक जेवण केल्याशिवाय जात नाहीत. कोणतेही सामाजिक, धार्मिक काम असो या कुटुंबाचे मोठे योगदान त्यात असते. आज त्यांची नवी पिढी सुशिक्षित आहे व ती या परंपरेचे तेवढ्याच आत्मीयतेने जतन करते याचे खूप समाधान वाटते. करोना बाधित व्यक्तीच्या कुटुंबापासून लोक अंतर ठेवून राहताना आपण बघतो. पण पडिले कुटुंबातील लोक दररोज याच लोकांसोबत राहून त्यांना सेवा देत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे.आपल्याला अशा कुटुंबाचे नातेवाईक असल्याचे मनापासून समाधान वाटते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com