करोना संक्रमणात पारनेर तालुका नंबर वन!

करोना संक्रमणात पारनेर तालुका नंबर वन!

प्रशासनाच्या चिंतेत वाढ : नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सुपा |वार्ताहर| Supa

देशभरात करोनाची दुसरी लाट कमी होत असतानाच पारनेर तालुका जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येच्या आकडेवारीत टॉपवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत तालुक्याला यावर्षी करोनाच्या दुसर्‍या लाटेचा मोठा तडाखा बसला आहे. देशासह जगभरात करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच पारनेर तालुका जिल्ह्यात रोजच्या संक्रमणात एक नंबरलाच आहे. पारनेर तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी रोजच्या बाधिताची संख्या पन्नासच्या आत आली असतानाच मंगळवारी (दि. 22 जून) 93 बाधित आढळले, तर बुधवारी (दि. 23) 90 करोना बाधित रुग्ण आढळून आले. हे आकडे शंभरच्या आत असले तरी जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत.

तालुक्यात आतापर्यंत 11 हजार 500 नागरिकांना करोनाची बाधा झाली असून 282 नागरिकांचा बळी गेला आहे. एकूण बळींच्या संख्येतील सुमारे सव्वा दोनशे नागरिकांचा चालू वर्षी मृत्यू झाला. तालुक्यात सुपा येथे सर्वाधिक मृत्यू दर आहे.

पारनेर तालुक्यात सध्या जवळपास 500 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेने तालुक्याला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात नगर शहर व इतर तालुक्यांतील रुग्णसंख्या घटत असली तरी पारनेर तालुक्यातील बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याने तालुका प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी करोना तपासणी कॅम्प लावण्यात आले आहेत.

55000 नागरिकांचे लसीकरण

पारनेर तालुक्यात आतापर्यंत आज अखेर 55000 नागरिकांचे करोना लसीकरण करण्यात आले आहे. यातील 30 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. लसीकरणात तालुका आघाडीवर असला तरी दैनंदिन रुग्णसंख्येच्या वाढीमुळे प्रशासन व आरोग्य विभागाची चिंता कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. मागील महिन्यात रोज 200-300 रुग्ण आढळत होते. त्या तुलनेत आता ही संख्या शंभरावर असली तरी जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

पारनेर तालुक्यात तपासणीचे प्रमाण चांगले असल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांचे लगेचच विलगीकरण केले जात असल्याने संक्रमण वाढण्याचा धोका कमी होईल. लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचा वेग वाढविला जाईल. नागरिकांनी करोना नियमांचे काटेकोर पालन करावे. -

- डॉ. प्रकाश लाळगे, तालुका आरोग्य अधिकारी, पारनेर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com