माझी तब्येत ठिक, नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी

आ. मोनिकाताई राजळे यांचे आवाहन
माझी तब्येत ठिक, नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) | Pathardi -

विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. विधिमंडळात प्रवेशासाठी करोना टेस्ट करणे आवश्यक असल्याने 4 सप्टेंबर रोजी पाथर्डी येथील कोव्हिड सेंटरमध्ये स्वतःची

करोना टेस्ट केली. 5 सप्टेंबर रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मला करोना संसर्गाची बाधा झाली आहे. माझी तब्येत पूर्णपणे ठिक असून कुणीही काळजी करू नये. मात्र, नागरीकांनी स्वत:ची व परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन शेवगाव-पाथर्डीच्या आ. मोनिकाताई राजळे यांनी केले आहे.

आ.राजळे यांच्या संपर्क कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले, माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मी तत्काळ नगर येथे पुढील वैद्यकीय चाचण्या आणि औषधोपचार सुरू करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक यांचा सल्ला घेऊन घरीच औषधोपचार घेत आहेत. माझी तब्येत चांगली आहे. मला सध्या कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे कुणीही काळजी करू नये. दोन दिवसांपासून मला हजारो मेसेज व फोन येत आहेत. फोनवर काळजी घ्या व लवकर बर्‍या व्हा असे संदेश येत आहेत. तसेच सोशल मीडियावर आणि व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर पोस्ट टाकून लवकर बर्‍या व्हा, असे संदेश टाकण्यात येत आहेत.

मतदारसंघातील जनता, नागरिक, मतदार, आप्तेष्ठ, स्नेही, कार्यकर्ते, पदाधिकारी व बंधू-भगिनीचे हे प्रेम, जिव्हाळा पाहून मी भारावून गेले. सर्वांच्या शुभेच्छा, पाठबळ, थोरा-मोठ्यांचे आशिर्वाद माझ्या सोबत आहेत. त्यामुळेच या संकटातून मी निश्चितच बरी होईल व पुन्हा तुमच्या सुख दु:खात, सेवेत रुजू होईल याची मला खात्री आहे. सर्वांचा स्न्नेह, प्रेम हीच माझी उर्जा आहे. मी सर्वांची ऋणी आहे. तसेच मतदार संघातील सर्वांना कळकळीची विनंती आहे की करोना साथरोगाला सहज घेऊ नका, स्वत:ची काळजी घ्या, संसर्ग साखळी तोडण्यासाठीचे नियम पाळा, व्यक्तीगत स्वत:चे व कुटुंबाचे आरोग्य सांभाळा, आपल्यापासून कोणालाही संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या. मला वैद्यकीय सल्ल्यानुसार किमान 14 दिवस किंवा पुढील करोना चाचणी निगेटीव्ह येईपर्यंत, विलगीकरण व वैद्यकीय निगराणी खालीच राहावे लागणार असल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार कोणाला भेटता येणार नाही. त्यामुळे सध्या मला भेटण्यासाठी येऊ नये, असे आवाहन आ. राजळे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com