करोनाच्या सरकारी ड्युटीला दांडी, डॉक्टरविरोधात गुन्हा

जिल्ह्यातील पहिलीच घटना
करोनाच्या सरकारी ड्युटीला दांडी, डॉक्टरविरोधात गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचारासाठी दिलेल्या सरकारी ड्युटीला दांडी मारणे आणि कर्तव्यात कसूर करणे नगरच्या एका डॉक्टरांना चांगलेच महागात पडले आहे. संबंधित डॉक्टरांविरोधात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाप्रकारे करोना ड्युटीस गैरहजर राहिल्याने खासगी डॉक्टरांवर गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.

डॉ. पियुष मराठे असे या वैद्यकीय अधिकार्‍याचे नाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेचे नायब तहसीलदार राजू गोविंद दिवाण यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हाधिकारी यांच्या 29 जुलैच्या आदेशानुसार जिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी डॉ. मराठे व इतर वैद्यकीय अधिकारी यांची दिनांक व वेळेनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे.

नेमणूक करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना नेमणुकीच्या कालावधी दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उपस्थित राहून रुग्णांवर उपचार करण्याबाबत तसेच जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय जिल्हा रुग्णालयाचे आवार सोडू नये, असे आदेश दिलेले असतानाही डॉ.मराठे हे नेमणुकीच्या ठिकाणी नियुक्ती दिवशी व वेळी गैरहजर असल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या लक्षात आली.

त्यानुसार डॉ. मराठे यांना 13 ऑगस्ट रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून दोन दिवसामध्ये खुलासा मागितला होता. डॉ. मराठे यांनी याबाबत खुलासा न केल्याने त्यांनी शासकीय कामकाजात टाळाटाळ करून वरिष्ठांचा आदेश पाळला नसल्याचे सिद्ध झाले. यामुळे नायब तहसीलदार राजू दिवाण यांच्या फिर्यादीवरून डॉ. मराठे यांच्या विरोधात भादंवि 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com