अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात गत वर्षभरापासून करोनाच्या थैमानामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्याच्या नियमित शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार विद्यार्थी शालाबाह्य होऊ नयेत, असे प्रयत्न असतांना वाढत्या स्थलांतरामुळे यंदा शाळा बाह्य विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची भिती आहे. यामुळे यंदा विशेष खबरदारी घेवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत असून हे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे.

दरम्यान, यंदा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पातळीपासून गाव आणि वार्ड पातळीपर्यंत समित्या स्थापन करण्यात आल्या असून गावपातळीवर तर सरपंचापासून ते पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक हे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोध मोहिमेत सहभागी आहेत. हे सर्वेक्षण आज संपणार असून येत्या दोन दिवसांत शालाबाह्य विद्यार्थ्यांची आकडेवारी समोर येणार आहे.

दरवर्षी जानेवारी महिन्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबविण्यात येते. यंदा करोना संसर्गामुळे उशीरा झाला असला तरी यंदाचे सर्वेक्षण गंभीरपणे करण्यात येत आहे. बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षण कायद्यानूसार 6 ते 14 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्या बालकाचा हक्कच केलेला आहे.

शाळेत कधीही दाखल न झालेली तसेच शाळेत न जाणारी बालके, ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा ज्या बालकांनी प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केले नसेल अशा 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालक एक महिन्यांपेक्षा अधिककाळ सातत्याने अनुपस्थित राहत असेल, तर त्या बालकांना शाळाबाह्य ठरविण्यात येत आहे. अशा बालकांचा सर्वेक्षण करून त्यांना शाळेत दाखल करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रत्येक शाळेवर असणारे शिक्षक या शाळाबाह्यांच्या शोध मोहिमेत सहभागी झालेले आहेत. आज सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस असून दोन दिवसांत अहवाल तयार होणार आहे. करोना संसर्गामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेले असून या पार्श्वभूमीवर शाळाबाह्यांच्या शोध मोहिमेला महत्व आले आहे.