अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून करोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. यात आतापर्यंत 1 लाख 39 हजार 350 करोना डोस नागरिकांना देण्यात आले असून

यात 30 हजार डोस हे लष्काराला देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेकडील करोना लसीचा साठा संपला असून आज नव्याने 3 लाख डोस येणार आहेत. दरम्यान, फ्रंटलाईन वर्कर असणार्या शासकीय विभागातील नोंदणी केलेल्या आरोग्य विभागाला करोना लसीचे वावडे असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या 37 हजार 328 कर्मचार्यांनी करोना लसीकरणासाठी नोंदणी केलेली आहे. यातील 14 हजार 391 पहिला आाणि 10 हजार 385 करोनाचा दुसरा डोस घेतलेला आहे. महसूल विभागाच्या 2 हजार 161 कर्मचार्यांनी नोंदणी केलेली असून यातील 1 हजार 138 कर्मचार्यांनी पहिला आणि 17 कर्मचार्यांनी दुसरा डोस घेतलेला आहे. पोलीस दलातील 1 हजार 700 कर्मचार्यांनी पहिला आणि 36 कर्मचार्यांनी दुसरा डोस घेतलेला आहे. पंचायत राजच्या 6 हजार 333 कर्मचार्यांपैकी 2 हजार 835 कर्मचार्यांनी पहिला डोस घेतलेला आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करोना जिल्ह्यात लसचा पुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 39 हजार करोना लस देण्यात आली असून यात लष्काराने 30 हजार डोस नेलेले आहेत. उर्वरित शासकीय आणि खासगी रुग्णालयानांना पुरविण्यात आलेली आहे. आज आणखी 3 लाख डोसची मागणी केली असून आज हे डोस उपलब्ध होणार आहेत.

जिल्हा पोलीस दलातील एक हजार 693 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना करोनाची लस देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी अधिकार्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. करोना कालावधीत रस्त्यावर उतरूण काम करणार्या अनेक पोलिसांना करोनाची बाधा झाली होती. त्यात काही कर्मचार्यांना जीव गमावा लागला आहे. करोना लॉकडाऊन काळात पोलिसांनी दिवसरात्र काम करून लोकांचा जीव वाचविला. जिल्हा पोलीस दलातील सुमारे तीन हजार पोलीस कर्मचारी करोना काळात मेहनत घेत होते. प्रतिबंधीत क्षेत्रासह आवश्यक असेल त्याठिकाणी पोलिसांनी अन्न, औषेधे पोहच केली. करोना लसीकरणासाठी शासनाने प्रत्यक्ष आघाडीवर कर्मचार्यांना लस देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार 162 पोलीस अधिकारी व दोन हजार 936 कर्मचार्यांना करोनाची लस देण्याचे जिल्हा पोलीस दलाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 92 पोलीस अधिकारी व एक हजार 601 कर्मचार्यांना लस देण्यात आल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आले. यात पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम नियोजनबद्धरीत्या राबविण्यात येत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण

जिल्ह्यातील 96 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 24 उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी करोना लसीकरण सुरू झाले आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी करोना लसीकरण करण्यात येणार आहे. राहुरी तालुक्यात वांबोरी, नेवासा तालुक्यातील घोडेगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी लसीकरण सुरू होणार आहे.