करोना मयत वारसांना तात्काळ 50 हजार सानुग्रह अनुदान द्यावे - सौ. कोल्हे

स्नेहलता कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

राज्यात करोना महामारीचा प्रकोप जानेवारी 2020 पासून सुरू झाला. त्यात असंख्य निराधार, तरुण, अबाल वृध्द रुग्ण करोनाने आजारी पडून उपचार घेऊ लागले. मात्र त्यात असंख्य रुग्ण दगावले. कोपरगाव विधानसभा मतदार संघातही मोठ्या प्रमाणात रुग्ण करोनाने मयत झाले असून त्यांच्या वारसांना शासनाने 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना आपत्तीत देशातील 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देऊन येथील प्रत्येकाच्या पोटाची काळजी घेतली. कोपरगांव विधानसभा मतदार संघातील काही करोनाग्रस्त रुग्णांनी मिळेल तेथून मदत गोळा करून महागडी उपचार सुविधा घेतली. औषधांचा तुटवडा असतानाही रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात शेकडो रुग्णांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यात कुटुंबाच्या आधारस्तंभ प्रमुखांची संख्या मोठी आहे.

परिणामी त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबातील अन्य घटक उघड्यावर पडले आहेत. त्यांना दैनंदिन चरितार्थ कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मोलमजुरी करून पोटाचा चरितार्थ करणार्‍या रुग्णांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे अशा करोनाग्रस्त रूग्णांच्या नातेवाईकांना शासनाने मदत करावी म्हणून मागणी केली होती. त्यासाठी 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला त्याचे प्रस्ताव शासन स्तरावर दाखल करण्यात आले आहेत. अशा रुग्णांच्या नातेवाईकांना ही मदत तात्काळ द्यावी. जेणेकरून त्याचा काही प्रमाणात या कुटुंबांना आधार होणार आहे, असेही स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com