अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या दोन ग्रामसेवकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी 50 लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.

यात वाळकी (ता. नगर) येथील ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वैराळ व वारणवाडी-नांदूर पठार (ता. पारनेर) येथील ग्रामसेवक प्रशांत अहिरे यांचा समावेश आहे. शासनाने या करोनायोद्धांसाठी प्रत्येकी 50 लाखांचे विमा कवच जाहीर केले होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरूवारी नगर दौर्यावर असताना या कर्मचार्यांच्या कुुटुंबीयांना या रकमेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात अर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप ग्रामस्थांना करण्यात येणार आहे. त्या औषधाचे प्रातिनिधीक वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते नगर तालुक्यातील पंचायत समिती सभापती व गटविकास अधिकार्यांना करण्यात आले.तर जिल्हा परिषदेच्या विविध प्रश्नांसंदर्भात अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले.

जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून रूग्णवाहिका खरेदी करण्यास मंजुरी मिळावी, 14 व्या वित्त आयोगातून विविध नळपाणीपुरवठा योजनेच्या वीज देयकापोटी राज्यस्तरावर रक्कम कपात केलेली आहे. या रकमेचे ग्रामपंचायतनिहाय विवरण द्यावे, केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत.

त्याऐवजी या योजनेचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षांना देण्यात यावे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वर्ग क व ड मधील रिक्त पदे तातडीने भरावतीत, जिल्ह्यातील 152 बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या सेवा नियमित करण्याबाबत न्यायालयाने निकाल दिलेला आहे. त्या आरोग्यसेविका खूप दिवसांपासून जिल्हा परिषद सेवेत असून त्यांचे समायोजन झाले नाही. इतर जिल्ह्यातील आरोग्य सेविका यांचे समायोजन झालेले आहे. त्यामुळे या कर्मचाजयांना नियमित करण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, काशिनाथ दाते, उमेश परहर, मीरा शेटे, संदेश कार्ले, शरद नवले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निखीलकुमार ओसवाल आदी उपस्थित होते.