करोना नियंत्रणात आणण्यासाठी अधिकारी 
नियुक्त करा
सार्वमत

करोना नियंत्रणात आणण्यासाठी अधिकारी नियुक्त करा

शिवसेनेचे कदम यांची मागणी

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात करोनाची स्थिती भयानक असून त्याला कंट्रोल करण्यासाठी शहरात वरिष्ठ अधिकार्‍यांची नेमणूक करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. तसेच शहरात कोव्हिड सेंटरची संख्या वाढवावी, प्रत्येक तालुक्यात विद्युत दाहिनी सुरू करावी, अशी मागणीही कदम यांनी यावेळी केली.

राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना कदम यांनी पत्र पाठविले आहे. नगर शहर व जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून बाधितांची संख्या 10 हजारांच्यावर गेली आहे. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा यांनी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे कदम यांनी पत्रात म्हटले आहे.

नगर शहरात करोनाची जी परिस्थिती उद्भवली आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे एखादा वरिष्ठ अधिकारी नियुक्त करावा, अशी कदम यांची मागणी आहे. एखाद्या व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो, तेव्हा त्यास कोणत्या हॉस्पिटलमध्ये जावे हे उमजत नाही. तो ज्या-ज्या ठिकाणी जातो, त्या-त्या ठिकाणी जागा शिल्लक नसल्याचे कारण दिले जाते.

अशावेळी तो बाधित रुग्ण घरीच थांबतो. त्यासाठी कोणत्या हॉस्पिटलमध्ये जागा शिल्लक आहे, या माहितीसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात यावा. तसेच ज्या ठिकाणी रुग्णांना पॉझिटिव्हचे रिपोर्ट देण्यात येतात, त्याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने समुपदेशन केंद्र असावे, त्या माध्यमातून रुग्णाला आलेल्या रिपोर्टविषयी माहिती देण्यात यावी. तसेच शहरात आणखी कोव्हिड सेंटर सुरू करावे, त्या माध्यमातून गोरगरीब जनतेची होणारी हेळसांड त्वरित थांबेल व रुग्णसंख्याही वाढणार नाही, अशी अपेक्षा कदम यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com