करोना आचारसंहितेत मामुली ढील !
सार्वमत

करोना आचारसंहितेत मामुली ढील !

जिल्हाधिकारी द्विवेदी : संचारबंदी आणि अन्य उपाययोजना 31 ऑगस्टपर्यंत कायम

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahemdnagar

‘मिशन बिगिन अगेन’ मोहिमेंतर्गत राज्य शासनाने लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडण्याबाबत मागदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने नगर जिल्ह्यामध्येही पाच ऑगस्टपासून मॉल, कॉम्प्लेक्स, बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सामाजिक अंतर राखून ही सेवा सुरू होणार आहे. दरम्यान, संचारबंदीचे नियम, अन्य उपाययोजना आणि जिल्हा प्रशासनाचे आदेश 31 ऑगस्टपर्यंत ‘जैसे थे’ राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील यापूर्वीची करोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर काय बंद राहणार आणि काय सुरू राहणार या आदेशाची मुदत 31 जुलैला संपली आहे. दरम्यान राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

त्याअनुषंगाने शुक्रवारी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आदेश काढून नव्या उपाययोजनांबाबत सविस्तर सूचना दिल्या. यातील नवीन आदेशानुसार मॉल्स, बाजारसंकुले (चित्रपटगृह वगळून) सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत यातील नवीन आदेशानुसार मॉल्स, बाजारसंकुले (चित्रपटगृह वगळून) सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू करता येणार आहेत.

मॉलमधील रेस्टॉरंट्स व फूड कोर्ट्सचे किचन यांना स्थानिक प्राधिकरणाच्या एसओपीनुसार होम डिलिव्हरीची परवानगी असेल. याशिवाय गोल्फ कोर्स, आऊटडोअर फायरिंग रेंज, जिम्नॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा बिगर समूह बाह्य क्रीडा प्रकारास शारिरीक अंतर ठेवून व स्वच्छतेच्या उपाययोजनांसह परवानगी असेल. या सेवा 5 ऑगस्टपासून सुरू होतीत, असे आदेशात म्हटले आहे.

अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे त्याच राहतील. त्यात मुख्यत्वे संचारबंदीचा समावेश आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी फिरण्यावर सायंकाळी 7 ते पहाटे 5 पर्यंत निर्बंध असतील. पूर्वीप्रमाणेच सर्व दुकाने, बाजारपेठा सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुल्या राहतील. जलतरण तलाव, सिनेमा हॉल्स, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, प्रेक्षागृहे, प्रार्थनागृहे बंदच राहतील.

जिल्हांतर्गत बससेवा 50 टक्के क्षमतेसह सुरू राहील. आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास अनिवार्य आहे. शासनाच्या अटी-शर्ती पाळून केस कर्तनालये, स्पा, सलून, ब्युटी पार्लर उघडण्यास परवानगी असेल, मात्र त्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालक आवश्यक राहणार आहे. लग्न समारंभ आणि अंत्यविधीसाठी आधीचे आदेश आताही राहणार आहेत.

सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी चेहरा झाकणे, सामाजिक अंतर राखणे, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी जमण्यास मनाई, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास दंड, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू सेवनास मनाई, कामाची ठिकाणे, सततच्या संपर्कातील वस्तूंचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे या बाबींचे पालन करण्याचे निर्देश आदेशात दिले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com