करोना मदतनीधी अर्ज ग्रामपंचायतींमधून मोफत भरून दिले जाणार

‘मिशन वात्सल्य’ समन्वय समिती बैठकीत नेवाशाचे तहसीलदार सुराणा यांचे निर्देश
करोना मदतनीधी अर्ज ग्रामपंचायतींमधून मोफत भरून दिले जाणार

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

करोनामुळे ज्या घरातील व्यक्तींचे निधन झाले आहे. त्या कुटुंबास सरकारकडून 50 हजार रुपये मदत निधी दिला जाणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या पोर्टलवर हे अर्ज आवश्यक त्या माहितीसह भरणे गरजेचे असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमधून हे मदत निधीचे अर्ज मोफत भरून दिले जातील, असे निर्देश तालुका समन्वय सामितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिले आहेत.

करोनामुळे एकल (विधवा) झालेल्या महिलांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत समन्वय समितीची बैठक तहसील कार्यालयात नुकतीच झाली. त्यात 50 हजार मदत निधी, संजय गांधी निराधार योजना, बालसंगोपन योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजना, शालेय विद्यार्थी फी माफी, एकल महिलांवर होणारे अन्याय, समाजकंटकांपासून होणारा त्रास, स्थावर व जंगम मालमत्तेत अधिकार आदींबाबत चर्चा करण्यात आली.

50 हजार रुपये मदत, कोविड-19 असे मृत्यूचे कारण असलेला दवाखान्याचा मृत्यूचा दाखला किंवा आरटीपीसीआर पॉझिटिव्ह रिपोर्ट, ग्रामपंचायतचा मृत्यू दाखला, मयताचे कुटुंबातील अर्जदार व मयत व्यक्तीचे आधार कार्ड, अर्जदाराचे बँकेचे पासबुक इ.पोर्टलवर भरावे. ज्यांना मोबाईलवर शक्य नाही त्यांनी आपआपल्या ग्रामपंचायतमधून मोफत अर्ज भरता येतील. तसेच सर्व ग्रामपंचायतींना आदेश दिले जातील असे गटविकास अधिकारी शेखर शेलार म्हणाले. याबाबत काही अडचण असल्यास करोना एकल समितीचे कार्यकर्ते कारभारी गरड, भारत आरगडे, रेणुका चौधरी, अप्पासाहेब वाबळे यांचेशी संपर्क साधावा.

एकल (विधवा) महिलांना कुणी घरगुती कारणावरून, शेत जमिनी, घर यांचेवरून वाद करून त्रास देत असतील, समाजातील वाईट प्रवृत्तीचे लोक वेगळ्या हेतूने त्रास देत असतील तर त्यांचा बदोबस्त केला जाईल असे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सांगितले. तालुक्यातील सोनई व शिंगणापूर येथील पोलीस निरीक्षक यांनाही प्रत्येक बैठकीस निमंत्रीत करावे, विनाअनुदानीत शाळेतील विद्यार्थ्यांना संबंधित शाळेने फी मागणी करू नये, मदत निधीचे अर्ज प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मोफत भरून घ्यावे, अशी मागणी अशासकीय सदस्य कारभारी गरड यांनी केली. बालसंगोपन कॅम्प डिसेंबरमध्ये घ्यावा, अशी अशासकीय सदस्य भारत आरगडे यांनी सूचना केली. एकल महिलांचे ‘उमेद’ योजनेअंतर्गत बचत गट स्थापन करावे, असे जिल्हा समन्वयक अशोक कुटे म्हणाले. महिलांच्या गृह कर्ज व बँका पतसंस्था, खाजगी कर्जाबाबत दिलासा मिळावा, असे अशासकीय सदस्य रेणुका चौधरी म्हणाल्या.

बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी सूर्यवंशी, गट शिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार अण्णासाहेब डमाळे, विधी सेवा प्राधिकरणचे सुनिल लांबदडे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे आदिंची उपस्थिती होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com