करोनामुळे ब्युटी पार्लर व्यवसायावर कोसळले संकट

कॉस्मेटिक बाजारही वर्षभरापासून थंडावला
करोनामुळे ब्युटी पार्लर व्यवसायावर कोसळले संकट

करंजी |वार्ताहर|Karanji

महिलांनी सुरू केलेल्या ब्युटी पार्लर व्यवसायातून त्यांच्या कुटुंबासाठी मोठा हातभार लागत होता. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी करण्यात आलेला लॉकडाऊन व आताचे ब्रेक द चेनच्या माध्यमातून घातलेले निर्बंधामुळे ब्युटी पार्लर व्यवसायवर संकट कोसळले आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेला कॉस्मेटिक बाजारही वर्षभरापासून थंडावला असून एकमेकांना पूरक असलेल्या या दोन्ही व्यवसायातून होणारी आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.

नगर व पाथर्डी तालुक्यात ब्युटीपार्लरची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील महिलांनी कौशल्यातून सुरू केलेल्या ब्युटी पार्लर व्यवसायातून त्यांच्या कुटुंबासाठी हातभार लागतोच त्याचबरोबर यातून अनेक महिला मुलींना चांगला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लग्नसराईच्या महिन्यांत हा व्यवसाय तेजीत चालतो. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीचा लॉकडाऊन व आता ब्रेक द चैनच्या माध्यमातून घातलेले निर्बंधामुळे लग्नसराईच्या काळातच पार्लर बंद ठेवण्याचे शासनाचे निर्देश या व्यवसायासाठी मोठे अडचणीचे ठरले आहेत.

कॉस्मेटिक दुकानांमध्ये पार्लरसाठी लागणार्‍या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी असायची. मात्र, विवाह सोहळे व इतर कार्यक्रमांना बंदी असल्याने ब्युटीपार्लर व कॉस्मेटिक या दोन्ही व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असल्याचे रूपाली एडके, अर्चना धाकतोडे, मीरा भाबड, दीपिका अग्रवाल, संगीता खंडागळे, अर्चना बेरड, मनिषा अडसूळ, अर्चना खांदवे, प्रतिमा भुजबळ, अलका मुखेकर, अलिशा सय्यद, शितल राठोड यांनी सांगितले.

घरातील प्रत्येक स्त्रीला आपण लक्ष्मी मानतो. मग घरात लक्ष्मी येण्यासाठी, कुटुंबातील सर्व व्यक्ती निरोगी आणि तणावमुक्त राहण्यासाठी घरातील लक्ष्मी देखील सुंदर दिसायला हवी. त्यामुळे ब्युटी पार्लर बंद असायला नकोत. तसेच अनेक महिला भगिनींनी बँकेकडून कर्ज घेऊन ब्युटी पार्लरसह या व्यवसायाला पूरक असलेल्या कॉस्मेटिक साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. वर्षभरापासून या करोनामुळे अनेक लग्न सोहळे रद्द झाले असल्याने मेकअपच्या ऑर्डर देखील रद्द केल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया या व्यवसायातील महिलांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com