
राहुरी विद्यापीठ |वार्ताहर|Rahuri Vidyapit
महाराष्ट्र राज्यामध्ये मका पिकाखाली सुमारे 12 लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादकताही 3 टन प्रतिहेक्टर इतकी आहे. जागतिक पातळीवर मका उत्पादकता सरासरी 5 टन आहे. उत्पादकतेमधील हे अंतर कमी करण्यासाठी शेतकर्यांच्या कष्टाला योग्य तंत्रज्ञानाची जोड हवी, असे प्रतिपादन संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मका पिकाचे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. विजू अमोलीक, श्रीमती सीमा मुंडले, शिलानाथ पवार, डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. सोमनाथ धोंडे, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि महाराष्ट्रातून आलेले कृषी विभागाचे कृषी अधिकारी उपस्थित होते.
डॉ. प्रमोद रसाळ म्हणाले, या तीन दिवसीय प्रशिक्षणात आपण जे काही मका पीक उत्पादन तंत्रज्ञान आत्मसात केले आहे, ते तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकर्यांपर्यंत पोहोचावे. प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये बियाणे निवड, जमीन मशागत, माती व पाणी व्यवस्थापन, तण, कीड व रोग व्यवस्थापन तसेच प्रक्रिया व मुल्यवर्धन आणि विपणन याविषयी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. स्वागत व प्रास्ताविक डॉ. विजू अमोलीक यांनी केले. सूत्रसंचालन शिलानाथ पवार यांनी केले तर आभार श्रीमती सीमा मुंडले यांनी मानले.