मका पिकावर नाकतोडे सदृश किडीचा प्रादुर्भाव
सार्वमत

मका पिकावर नाकतोडे सदृश किडीचा प्रादुर्भाव

रांजणगाव परिसरातील मका उत्पादक शेतकरी चिंतेत

Arvind Arkhade

रांजणगाव देशमुख|वार्ताहर|Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील एका शेतकर्‍याची मका नाकतोडे सदृश किडीने पुर्णत:खाऊन घेतली असून मकाचे फक्त ताटेच शिल्लक राहिली आहेत. यामुळे परिसरातील शेतकर्‍यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर्षी वेळेत आणि चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी जास्त पावसामुळे पिकांची आधिच नासाडी होत आहे. त्यात आता नाकतोडे सदृश किडी संपूर्ण पिकच खाऊन घेत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रांजणगाव देशमुख येथील विजय उदावंत यांच्या शेतातील मका दोन दिवसांत नाकतोडे सदृश किडीने संपूर्ण खाऊन टाकली आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मागील वर्षी मका पिकाला लष्करी अळीने मोठा त्रास दिला. यावर्षी नाकतोडेंनी पिके जमीनदोस्त करण्यास सुरुवात केल्याने आधिच अडचणीत असलेले शेतकरी अधिक अडचणीत येणार आहे. अनेक शेतकर्‍यांना काही पिकांचा दुबार पेरणीचा सामाना करावा लागला त्यात आता नविन अडचणीचा सामना करावा लागत आहे.

दमट वातावरणात नाकतोडे अंडी घालतात. शेतकर्‍यांनी नाकतोडे आढळलेल्या पिकावर क्लोरोपायरीफॅास 50 टक्के ईसी ची फवारणी करावी. फवारणीमुळे नाकतोड्यांचा पूर्ण नाश होईल. शेजारील शेतकर्‍यांनीही फवारणी करावी.

- अशोक आढाव, तालुका कृषी आधिकारी

Deshdoot
www.deshdoot.com