कोथिंबिरीने शेतकर्‍यांना रडवले

पारनेर, सुपे बाजरात दोन रुपयांना जुडी
कोथिंबिरीने शेतकर्‍यांना रडवले

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

कोथिंबिरीचे बाजार पडल्याने मातीमोलभावाने कोथिंबीर विकली जात आहे. पारनेरच्या ठोक बाजारात दोन रुपयाला जुडी विकली जात असून सुपा बाजारत हात विक्रीवरही दोन तीन रुपयाला कोथिंबीरीची जुडी विकली गेली. यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी तराळले.

पाऊस थांबल्यानंतर शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहेत. थोड्या दिवसांत, थोड्या भांडवलात दोन पैसे मिळणारे पीक म्हणून शेतकरी मेथी, शेपू, कोथिंबीर ही पिके घेतात. यांना दीपावली दरम्यान चांगले दर असल्याने अनेक शेतकर्‍यांनी मेथी तसेच कोथिंबिरीचे पीक घेतले आहे. परिणामी अचानक बाजरात आवक वाढल्याने कोथिंबिरीचे भाव ढासळले.

धने शंभर ते एकशे वीस रुपये किलो, त्याला लागवड, खुरपणी, खते, औषधे, उपटण्यासाठी प्रती व्यक्ती तीनशे रुपये मजुरी, वाहतूक व इतर खर्च हे सर्व पाहता कोथिंबिरीला मिळणारा बाजाार पाहता शेतकर्‍यांचे वाहतुकीचेही भाडे वसूल होत नसल्याचे चित्र आहे.

गेली चार पाच महिने सतत पाऊस पडल्याने उभी पिके जागेवर सडली, फूल शेती फेल गेली, नगदी पिकाचा दर्जा खालावला तर त्याचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले. अशात पाऊस उघडला म्हणून शेतकर्‍यांनी दोन पैसे मिळतील म्हणून कोथिंबीरीकडे पाहिले तर या पिकाला बाजारभाव नसल्याने कोथिंबीरने शेतकर्‍यांना चांगलेच रडवले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com