भरारी पथक हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

बीडीओंना कारवाईसाठी पोलीसांना लेखी पत्र देण्याची वेळ
भरारी पथक हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील टाकळीमानूर येथील काँपी विरोधी भरारी पथकावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे यांना पोलिस निरीक्षकांना लेखी पत्र देऊन करावी लागली. यामुळे याची अधिक चर्चा रंगली आहे.

तालुक्यातील टाकळीमानुर येथील भवानीमाता माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षेत काँपी विरोधी पथकावर बुधवारी (दि.15) दुपारी बारा वाजता हल्ला झाला. यामधे दगड लागुन एकजण जखमी झाला.गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे व त्यांच्या पथकाला शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तक्रार दाखल करुन गेण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करण्यात आली.

तिन तास तक्रारदार व गटविकास अधिकारी यांना बसवुन ठेवण्यात आले. त्यानंतर काही मंडळींनी मध्यस्ती करुन हा वाद मिटविण्यात आला. जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुचना दिल्यानंतर पंचायत समितीच्या प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. मात्र तेथील काही लोकांनी फिर्याद दाखल होवु नये अशा उद्देशाने जाणीवपुर्वक दिरंगाई केल्याचा आरोप पंचायत समितीच्या प्रशासनाने केला आहे.

त्यांनी तक्रार दाखल करुन घेण्यात यावी असी विनंती करुनही तीन ते साडेतीन तास टाळाटाळ करण्यात आली. हा सर्व घटनाक्रम तेथील सीसीटीव्ही कँमेर्‍यात कैद झालेला आहे. त्यानंतर फिर्यादीच्या नाकातुन रक्त वाहु लागल्याने ते दवाखान्यात निघुन गेले. गुरुवारी सकाळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे यांनी टाकळीमानुर पीरक्षा केंद्रावर झालेल्या पथकावरील हल्याबाबत कायदेशीर कारवाई व्हावी असे पत्र पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना दिले आहे.

पाथर्डी कॉपीची राज्यभरात महती

विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळाच्या सभागृहात टाकळीमानुर येथील भरारी पथक हल्ला व केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्ना बाबात प्रश्न उपस्थीत केला. तसेच हल्लेखोरांवर कारवाई होण्याबरोबरच यासाठी कडक कायदा करण्याची मागणी त्यांनी केली. यामुळे पाथर्डीतील काँपीची महती पुन्हा एकदा राज्य पातळीवर पोहचली आहे. काँपीमुक्त अभियानाचा कसा फज्जा उडाला याचा दाखला अजित पवारांनी सभागृहामधे दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com