लोणी (वार्ताहर) -

केंद्र सरकारच्या धोरणामुळेच सहकारी साखर कारखानदारीला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मादी आणि गृहमंत्री

अमित शहा यांनी साखर कारखान्यांबाबत दुरदृष्टीने घेतलेल्या निर्णयांचा सकारात्मक परिणाम भविष्यात निश्चित दिसेल, असा विश्वास माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

पद्मश्री डॉ. विट्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 71 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आ. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, चेअरमन नंदू राठी, डॉ. भास्करराव खर्डे, व्हा.चेअरमन विश्वासराव कडू, कैलास तांबे, रामभाऊ भुसाळ, आण्णासाहेब कडू, कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे यांच्यासह सर्व संचालक याप्रसंगी उपस्थित होते. कारखान्याचे सभासद ऑनलाईन पध्दतीने या सभेत सहभागी झाले होते. विविध विषयांचे ठराव या सभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आले.

देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने साखरेच्या दराची निश्चिती केली. साखर निर्यातीलाही प्रोत्साहन आणि अनुदान देण्याचा निर्णय केला. साखर कारखान्यांच्या प्रश्नांसाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्री गटाने इथेनॉल बाबत सलग 5 वर्षाचे धोरण निश्चित केल्यामुळे येत्या वर्षभरातच सहकारी साखर कारखानदारीमध्ये मोठे परिवर्तन झालेले दिसेल, असे स्पष्ट केले.

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारने सहकारी साखर कारखानदारीच्या घेतलेल्या निर्णयांची माहीती देवून केंद्र सरकारच्या धोरणामुळेच सहकारी साखर काखानदारीला चांगले दिवस येणार आहेत, अनेक जन सहकार चळवळ संपवायला निघाले होते. अनेकांनी खासगी कारखाने काढले. आपण मात्र आव्हानात्मक परिस्थितीवर मात करुन, ही चळवळ निस्वार्थपणे पुढे घेवून जात आहोत. यामध्ये आमचा कोणताही स्वार्थ नाही. कर नाही त्याला डर कशाची असे स्पष्ट करुन डॉ.सुजय विखे पाटील यांनी भविष्यात कारखान्याच्या विस्तारीकरणाबाबत तसेच इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पाबाबत उपस्थित होणा-या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सभासदांना देण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांचेही भाषण झाले.